लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळा!- पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे कळकळीचे आवाहन

नांदेड जिल्ह्यात 250 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू

नांदेड, दि. ११ मार्च :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्ह्यामध्ये काही निर्बंध लागू होत असून, पुढील काळात लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियम पाळण्याची आवश्यकता आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिक सूज्ञ असून, त्यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी माझ्याकडे आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवस दररोज २०० रूग्ण सापडले आहेत. परिस्थिती भयभीत होण्यासारखी नाही मात्र इशारा देणारी व काळजी घेण्याची गरज अधोरेखित करणारी आहे. जिल्हा प्रशानाने लागू केलेले निर्बंध नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहेत. परिस्थिती चिघळली तर किती गंभीर वेळ येते, हे आपण यापूर्वी अनुभवले आहे. त्यामुळे पुन्हा तशी वेळ येऊ नये, हीच प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे.

जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांमुळे नागरिकांच्या दिनचर्येवर विशेष परिणाम होणार नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, दुकाने सुरळीतच राहणार आहेत. केवळ वेळेची मर्यादा घालून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तर मग कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा देतानाच मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसुत्री पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश ध्यानात ठेवून सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित रहावे, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

1 हजार 560 अहवालापैकी 1 हजार 253 निगेटिव्ह

नांदेड दि. 11 :- गुरुवार 11 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 250 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 118 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 132 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 83 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 560 अहवालापैकी 1 हजार 253 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 25 हजार 440 एवढी झाली असून यातील 23 हजार 204 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 413 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 38 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

गुरुवार 11 मार्च रोजी पिरबुऱ्हानगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 608 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 43, किनवट कोविड रुग्णालय 7, खाजगी रुग्णालय 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, देगलूर कोविड रुग्णालय 1, लोहा तालुक्यांतर्गत 2 असे एकूण 83 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 91.21 टक्के आहे.