थॉमस कप विजेत्या भारतीय संघाला 1 कोटी रुपयांचे बक्षीस केले जाहीर

नवी दिल्ली ,१६ मे /प्रतिनिधी :- प्रथमच थॉमस चषक जिंकत इतिहास घडवणाऱ्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बँकॉक येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या थॉमस चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारतीय पुरुष संघाने,  14 वेळा अजिंक्य राहिलेल्या इंडोनेशियावर 3-0 असा शानदार विजय मिळवला. 

Image

अनुराग सिंह ठाकूर यांनी उत्स्फूर्त निर्णय घेत या विजयाचा आनंद साजरा केला.  “प्ले-ऑफमध्ये मलेशिया, डेन्मार्क आणि इंडोनेशियावर लागोपाठ विजयासह थॉमस चषक  जिंकण्याच्या भारताच्या अनन्यसाधारण यशामुळे  नियम शिथिल करण्याची गरज भासली. सप्ताहाअखेर   भारतीयांना  अत्याधिक आनंद देणार्‍या संघाला  1 कोटी रुपयांचे  बक्षीस  जाहीर करताना अभिमान वाटतो,” असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

“लक्ष्य सेनने इंडोनेशियाविरुद्धचा सलामीचा सामना जिंकून उच्च मनोबलाचे दर्शन घडवले.  दुहेरीतील जोडी  एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला, कृष्ण प्रसाद गर्ग  आणि पंजाला विष्णुवर्धन गौड तसेच प्रियांशू राजावत यांना या ऐतिहासिक स्पर्धेचा भाग झाल्याचा अत्यंत उपयोग होणार असल्याची खात्री मला आहे,” असे ठाकूर म्हणाले.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंना प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी पाठबळ  देऊन संघाच्या अभूतपूर्व यशात योगदान दिले. जानेवारीपासून सुरू झालेल्या  10 आठवड्यांच्या राष्ट्रीय शिबिरामुळे खेळाडूंची तंदुरुस्ती  वाढण्यास मदत झाली. दुहेरी फेरीसाठीच्या जोड्यांना मदत करण्यासाठी मॅथियास बोई यांना प्रशिक्षक म्हणून सहभागी करून घेणेही महत्त्वपूर्ण ठरले.

गेल्या चार वर्षांत, मंत्रालयाने भारतीय बॅडमिंटन खेळाडूंना प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी परदेशी आणि भारतीय प्रशिक्षकांच्या वेतनासह 67.19 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.  गेल्या वर्षभरात तर  मंत्रालयाने 4.50 कोटी रुपये खर्चून तब्बल 14 आंतरराष्ट्रीय अनुभव देणाऱ्या दौऱ्यांना  मदत केली आहे.