महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम : ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

पृथ्वी पाटील ठरली देशातील सर्वोत्तम कॅडेट

नवी दिल्ली,२८जानेवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त केला आहे. तर पृथ्वी पाटील एनसीसीच्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट  (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान आज महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले.

येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या लष्कर,नौदल आणि वायुदलातील प्रत्येकी एक मुलगा व मुलगी अशा बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा कॅडेट कॅप्टन निकिता खोत आणि महाराष्ट्र एनसीसी  संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी तर सिनियर अंडर ऑफिसर सिध्देश जाधव यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. देशातील एकूण 17  एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 20२० ते  नोव्हेंबर 20२१ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर दिल्ली एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला तब्बल सात वर्षानंतर प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १७ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मागील वर्षी महाराष्ट्र हा प्रधानमंत्री बॅनरचा उपविजेता ठरला होता तर राज्याला जवळपास तब्बल सात वर्षाने हा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाल्याने या बहुमानाचे विशेष महत्व आहे.

 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वी पाटीलचा सन्मान

या कार्यक्रमात एनसीसीच्या वायुदलाच्या (सिनीयर विंग) बेस्ट कॅडेट्सचा बहुमान पटकाविणारी महाराष्ट्राची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिचा पंतप्रधानांच्या हस्ते मानाचे पदक व केन प्रदान करून सन्मान करण्यात आला. एनसीसी वायुदलाच्या बेस्ट कॅडेटसाठी देशातील कॅडेट्समध्ये चुरस होती.लेखी परिक्षा, समुह चर्चा आणि एनसीसी महासंचालकांसमोर प्रत्यक्ष मुलाखत व शिबिरातील परेड या निकषांवर बेस्ट कॅडेट्ची निवड करण्यात आली.

प्रधानमंत्री गार्ड ऑफ ऑनरमध्येही महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी

या विशेष कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एनसीसीच्या विविध विंगच्यावतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात येतो या मानाच्या गार्ड ऑफ ऑनरमध्येही महाराष्ट्राचे कॅडेट्स चमकले. महाराष्ट्राच्या  सिनीयर अंडर ऑफिसर गितेश डिंगर याला एनसीसीच्या चारही विगंच्या परेड कमांडरचा बहुमान मिळाला. एनसीसीच्या छात्रा विंगच्या नेतृत्चाचा बहुमान सिनीयर अंडर ऑफिसर सोनाली पाटील तर एअर फोर्स विंगचे नेतृत्व सिनीयर अंडर ऑफिसर राघवेंद्र सिंह याने केले.  प्रधानमंत्री गार्ड ऑफ ऑनरसाठी  एनसीसीच्या चारही विंगसाठी  निवड  झालेल्या देशातील ५७ कॅडेट्सपैकी सर्वात जास्त ७ कॅडेट्स हे महाराष्ट्राचे होते.

महाराष्ट्राची उत्कृष्ट कामगिरी

लेफ्टनंट कर्नल अनिरुध्द सिंह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या एनसीसी संघाने यावर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिल्लीतील कँन्टॉनमेंट भागात आयोजित एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात महाराष्ट्रातील ३४ मुले आणि २३  मुली असे एकूण ५७ कॅडेट्स सहभागी झाले .पुणे येथे 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 202१ या कालावधी दरम्यान या कॅडेट्सचा कसून सराव झाला व कोरोना चाचण्याअंती हे कॅडेट्स 1 जानेवारी  २०२२ रोजी  दिल्लीतील शिबिरात सहभागी झाले. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या पथ संचलनात सहभागी देशभरातील एनसीसीच्या १०० मुलींच्या तुकडीत महाराष्ट्राच्या ८ मुलींची निवड झाली. महाराष्ट्रातील १७ पैकी ९ मुलांची निवड राजपथवरील पथ संचलनासाठी झाली.

“शाब्बास… दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात…!” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन

तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी, सुविधा उभाराव्यात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: – ‘…महाराष्ट्राच्या जिद्द आणि चिकाटीचा झेंडा दिल्लीत फडकवलात..छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा वारसा सांगणारी कामगिरी बजावलीत…शाब्बास..भले बहाद्दर…’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनिस्टर्स बॅनर) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र  संचालनालयाचे अभिनंदन केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमूला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. या यशासाठी पृथ्वी हिचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान ध्वजाचा (प्राईम मिनिस्टर बॅनर) वाहक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, सर्वोत्कृष्ट संचालनालयासाठीचा पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळालेले महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाचे अभिनंदन

प्रजासत्ताक संचलनातील कामगिरीसाठी मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाचे अभिनंदन

मुंबई :- यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच एनसीसी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राच्या एनसीसी सिनीयर एअर फोर्स विंगची छात्रसैनिक, वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने यापूर्वी 17 वेळा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याचे, तसेच गेली दोन वर्षे उपविजेतेपद जिंकल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या छात्रसैनिकांच्या आजवरच्या गौरवशाली कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राचे सर्व छात्रसैनिक ‘एकता व अनुशासन’ या ब्रीदाचे पालन करुन समर्पित वृत्तीने राष्ट्रसेवा करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर बॅनर)चा वाहक छात्रसैनिक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, उत्कृष्ट ‘गार्ड ऑफ ऑनर’साठी सन्मानित सिनीयर अंडर ऑफिसर गितेश डिंगर, सिनियर अंडर ऑफिसर सोनाली पाटील, सिनियर अंडर ऑफिसर राघवेंद्रसिंह या छात्रसैनिकांसह महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत आदी एनसीसी अधिकाऱ्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी चमूचे अभिनंदन

महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

मुंबई :- प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल क्रीडामंत्री सुनील केदार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमूला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र  संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. पृथ्वी हिचेही श्री. केदार यांनी कौतुक केले आहे.