औरंगाबाद येथे ईव्ही बस आणि बॅटरी निर्मितीमध्ये गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्न : अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

सीएमआईएतर्फे आयोजित दोन दिवसीय राष्टीय उर्जा परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले मत


औरंगाबाद ,२९ एप्रिल  /प्रतिनिधी :- प्रदूषण न करणारी आणि कच्चातेलावरील भारताचे आयातवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ग्रीन मोबिलिटीवर लक्ष केंद्रित केले असून, २०३० पर्यंत कार्बन इमिशन ३०% ने  कमी करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.  यासोबतच भारताला इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केंद्र निर्माण करण्याचा सरकारचा निर्धार असून, नजीकच्या काळात औरंगाबाद येथे ईव्ही क्षेत्रातील मोठी गुंतवणूक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ईव्ही बस आणि बॅटरी निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या कंपन्यांसोबत यासंदर्भात बोलणी सुरु असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

ते चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चर – सीएमआयए आणि सीएसएमएसएस छत्रपती शाहू इंजिनियरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित दोनदिवसीय एनर्जी कॉन्क्लेव्हच्या (उर्जा परिषद ) उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.  या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. वी. काळे, जीआयझेड संस्थेचे आयजीव्हीइटी प्रकल्पप्रमुख डॉ. रॉडनी रेविरे, एमएसईडीसीएलचे सहव्यवस्थापक डॉ. मंगेश गोंदावले, सीएसएमएसएसचे अध्यक्ष रणजीत मुळे,  विश्वस्त समीर मुळे सीएमआयए अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सचिव सतीश लोणीकर आणि एनर्जी सेल प्रमुख राहुल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


डॉ. कराड म्हणाले औरंगाबाद पर्यटन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे, सीएमआयए  संस्थेने ईव्ही क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेल्या उर्जा परिषदेचे आयोजन करून त्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले आहे. ईव्ही क्षेत्रात आगामी काळात मोठ्या संधी असून आपले शहर त्यासाठी तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.


उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. वी. काळे म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्था आणि उद्योग यांनी एकत्र येऊन नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम विकसित केले पाहिजे.  भारतात नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण सादर करण्यात आले आहे, याचा फायदा आपल्या येथील शैक्षणिक संस्थाना होणार असल्याचे ते म्हणाले.  विद्यापीठ अनुदान आयोगाने ( युजीसी – UGC) नुकतंच एकाच वेळी एकाच किंवा वेगवेगळ्या दोन पदवीकरिता प्रवेश घेण्यासंदर्भात घोषणा केली आहे , यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन क्षेत्रात शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.


महावितरण उपव्यवस्थापक डॉ. मंगेश गोंदावले यांनी ईव्ही तंत्रज्ञानातील संधी आणि अडचणी याबद्दल माहिती देतांना सांगितले कि, या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी केंद्र सरकारने दहा हजार कोटी रुपये खर्च करणार असून, महावितरणाला महाराष्ट्र राज्यासाठी नोडल कंपनी म्हणून जवाबदारी दिली असल्याचे ते म्हणाले. राज्यात ईव्ही इकोसिस्टीम विकसित करण्यासंर्भात आतापर्यंत ४९७ ईव्ही चार्जिंग स्टेशन विकसित केले असून, नजीकच्या काळात अजून ३९७ स्टेशन विकसित करणार आहे. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद शहराचा समावेश असून, मराठवाड्यात सर्वदूर चार्जिंग शेत्षण उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईव्ही वाहनांना चालना देण्यासाठी सरकारच्या वतीने सबसिडी रुपात मदत केली जाते, तसेच रोड  टॅक्समध्ये पण सवलत दिली जात आहे. नवे तंत्रज्ञान विकसित होत असतांना आगामी काळात बटरी स्वपिंग, आणि रेट्रोफिटिंग या गोष्टींचा विचार करावा लागेल.  यावेळेस त्यांनी चार्जिंग स्टेशनवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटी करात सूट देण्याबाबत अर्थराज्यमंत्री कराड यांना विनंती केली.
जीआयझेड संस्थेचे आयजीव्हीइटी प्रकल्पप्रमुख डॉ. रॉडनी रेविरे यांनी ईव्ही तंत्रज्ञान हे भविष्य असून, या करिता आपण सर्वोतोपरी त्यात असले पाहिजे असे सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी जीआयझेड संस्थेच्या माध्यमातून तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रमाची यावेळेस घोषणा करण्यात आली. जगभरातील मोठ्या वाहन निर्मिती कंपन्या ईव्ही क्षेत्रात नाजीच्या काळात ७० बिलियन डॉलर ( 5 लाख कोटी रुपये) इतकी मोठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक रोजगार संधी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. 
कार्यक्रमाच्या सुरवातीला सीएमएआयचे सचिव सतीश लोणीकर यांनी सांगितले कि सीएमआयए उर्जा परिषदेचे हे सहावे पर्व असून, दोन दिवसीय परिषदेदरम्यान ईव्ही क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेल्या विषयांवर विवध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.  सीएसएमएसएस संस्थेचे प्राचार्य डॉ. उल्हास.शिंदे  म्हणाले पारंपारिक उर्जा स्त्रोत आणि ग्रीन एनर्जी आता काळाची गरज बनली आहे, संस्थेच्या वतीन महाविद्यालयात ईव्ही लैब विकसित केली असल्याचे त्यांनी सांगितले
मंथन, चर्चासत्र  यामधून वाहतुकीच्या तंत्रज्ञानातील अमुलाग्र बदल आणि या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या भविष्यातील संधीविषयी उपयुक्त माहिती या क्षेत्रात कार्यरत असलेले संशोधक, उद्योजक यांच्वियाकडून विद्यार्थ्यांना भेटणार असून, या परिषदेचा फायदा त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात होणार आहे असे मत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मांडतांना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केले. यावेळेस नितीन गुप्ता,  प्रसाद कोकीळ, हेमंत कापडिया, अर्जुन गायकवाड, गिरीधर संगेरीया, आर. पी. देशपांडे, रविशंकर कोरगल, रविंद्र मानवतकर, सीएसएमएसएसचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांची उपस्थिती होती. 
दिवसभरात तीन चर्चासत्राचे आयोजन

पहिल्या चर्चासत्रात बॉश संस्थेचे एस. ए. योगेश यांनी हायड्रोजन तंत्रज्ञानाबद्दल विस्तृत माहिती दिली. अजून प्राथमिक अवस्थेत असलेले हे तंत्रज्ञान ईव्ही क्षेत्रासाठी पूरक होऊ शकेल. तसेच लिथियमकरिता चीनवर अवलंबून असल्या कारणाने ईव्ही करिता देखील पर्याय म्हणून समोर येत आहे, असे ते म्हणाले. दुसर्या सत्रात जर्मनी येथून जोडले गेलेले ईव्ही तज्ञ लुंगी झुलो यांनी चार्जिंग स्टेशन विकसित करण्यासंदर्भात नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. या प्रस्नागी प्रश्नोत्तरात विद्यार्थ्यांच्या अनेक शंकाचे त्यांनी  निरसन केले.तिसऱ्या सत्रात धूत ट्रान्स्मिशनचे राजेश बाहेती यांनी ईव्हीसाठी लागणाऱ्या सुट्या भागाबद्दल तसेच बॅटरी सुरक्षा संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले