शहीद जवान सतीश पेहरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

साश्रुनयनांनी दिला आखेरचा निरोप

शहीद जवान अमर रहे.. घोषणांनी आसंमत निनादलाGal

जालना दि. 17 : गलवान खोऱ्यामध्ये शयोक नदीवर पुलाचे बांधकाम करताना झालेल्या अपघातामध्ये जवान सतीश सुरेशराव पेहरे (27 वर्ष) हे शाहिद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 17 जुलै रोजी जाफराबाद तालुक्यातील वरुड बु. या गावी शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरुड बु. येथील ग्रामस्थ व उपस्थितांनी साश्रुनयनांनी सतीश पेहरे यांना अखेरचा निरोप दिला.

16 जुलै रोजी त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथे आणण्यात आले व दि. 17 जुलै रोजी पार्थिव वरुड गावी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर वाहनातून पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी आणण्यात आले. दरम्यान गावातून पार्थिव वाहनातून आणत असताना गावकऱ्यांनी सामाजिक अंतराचे पालन करीत शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्प वर्षाव केला.

अंत्यसंस्कार स्थळी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे,आमदार संतोष दानवे, जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य,उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी,पंचायत समिती सभापती राजू साळवे, रवी तुपकर, मनोज गव्हाड, तहसिलदार सतीश सोनी,बुलढाणाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सय्यदा फिरासत, व्ही.एन.अनाळकर, श्रीराम सोनवणे, विनायक केंद्रे, सदानंद दाभाडे, संजय गायकवाड, सोनटक्के, पडघन,जाफराबादचे सरपंच वंदना सगट, यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहली.

शहीद जवान यांच्यापश्चात वडील सुरेश पेहरे, आई अलका सुरेश पेहरे पत्नी, जया सतीश पेहरे, मुलगा अर्णव सतीश पेहरे, भाऊ संदीप पेहरे व अनिल पेहरे एवढा आप्त परीवार असून शाहिद जवान सतीश पेहरे यांचे दोन्ही भाऊ सैन्यामध्ये सैन्यामध्ये कार्यरत आहेत.

शहीद जवान सतीश पेहरे हे 2013 मध्ये 115 इंजिनीअर रेजिमेंट मध्ये भरती झाले होते. त्यांच्या चितेला छोटा भाऊ अनिल व मुलाने चिताग्नी दिला. तेव्हा उपस्थितांना अश्रू अनावर झाले. गावातून पार्थिव आणतांना वरुड बु. येथील आसंमत शहीद जवान अमर रहे… सतीश पेहरे अमर रहे… या घोषणांनी निनादून गेला. यावेळी सैन्य व पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फ़ैरी हवेत झाडून मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *