मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामे प्रगतीपथावर – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई,२२ मार्च  /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामे प्रगती पथावर आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 30 हजार 337 किलोमीटर रस्त्यांच्या कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 8 हजार 308 किलोमीटरचे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. 11 हजार 441 किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून 621 किलोमीटर रस्त्याचे काम सुरु आहे. या कामासाठी 2020-21 मध्ये पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 200 कोटी रुपये देण्यात आले होते. 2020 ते आजतागायत या योजनेवर 13 हजार 111 कोटी रुपये खर्च झाला आहे. देयके देण्यासाठी उर्वरित येणे असलेली रक्कम 6 हजार 860 कोटी रुपये आहे. 2022-23 मध्ये 3 हजार 550 कोटी निधी उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये काही कंत्राटदारांची देयके थकित असल्याने कामे बंद होती. त्याला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याबाबत संबंधित कंत्राटदारांना तत्काळ काम सुरु करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या निधीअभावी काही कंत्राटदारांनी हेतुपुरस्कर या कामाकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून कार्यवाही करण्यात येईल. व वेळ पडल्यास काळ्या यादीमध्ये टाकण्याचे काम करण्यात येईल.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेली ग्राम परिवर्तन योजना (स्मार्ट) च्या माध्यमातून ग्राम परिवर्तन प्रकल्प राबविले जात आहेत. महिला बचत गटासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागामधील महिला आज पुढे येत असून महिला चुल व मूल एवढ्यावर न थांबता पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून काम करीत आहेत. महिला बचत गटांसाठी जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. त्या जागेमध्ये गाळे उपलब्ध करुन महिलांना आपले जीवनमान उंचाविण्यासाठी एक व्यासपीठ  उपलब्ध करुन देत आहोत. महिला बचत गटांना सक्षम करण्याची शासनाची भूमिका आहे.

लोकसंख्येच्यानुसार तांडे, वस्ती, वाडे, छोटी गावे याबाबत शासनाच्या 2004 च्या शासननिर्णयाबाबत अटी, शर्ती करता येईल का याबाबत विचार करीत आहोत. यासाठी मंत्रिमंडळासमोर जावे लागेल. राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी व्यवस्था करण्यात येणार असून यासाठी एक वरिष्ठ अधिकारी रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थित झाली का नाही हे पाहणार आहे. याबाबत काही त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. येणाऱ्या काळात प्रधानमंत्री आवास योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला चालना देण्यासाठी काम करीत आहोत, असेही ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबाबत निधी वितरीत करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री यांना या योजनेचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या समितीवर विधान परिषदेच्या सदस्यांना घेण्याबाबत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्या समवेत  चर्चा करुन  धोरणात्मक निर्णय घेऊ

कोराना काळात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी खूप कामे केली. यांच्या वेतनवाढीसंदर्भात शासन सकारात्मक आहे.  या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, संजय दौंड, अनिकेत तटकरे, मनिषा कायंदे, रमेश पाटील डॉ. रणजित पाटील यांनी सहभाग घेतला होता.