राज्याला विकासपथावर अग्रेसर ठेवणारा अर्थसंकल्प – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि. 8 : अर्थसंकल्पाद्वारे शेतकरी, महिला व दुर्बल घटकांचा विकास साधण्यावर भर देण्यात आला असून राज्याला विकासपथावर अग्रेसर ठेवणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, महिलांच्या प्रश्नांबाबत आणि आत्मसन्मानाबाबत सरकारची संवेदनशीलता अर्थसंकल्पातून दाखवून दिली आहे. नवीन घर विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत देण्याचा निर्णय क्रांतीकारी ठरणार आहे. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनाही अशीच क्रांतीकारी ठरणार आहे.

कोरोनाच्या संकटात राज्याला सावरणाऱ्या शेतकऱ्यांप्रतिही अर्थसंकल्पात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाण्याची घोषणा कृषि क्षेत्र बळकटीसाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

आरोग्य व्यवस्थेसाठी अर्थसंकल्पातील घोषणांमुळे कोरोनाची लढाई लढण्यास आणखी बळ मिळणार आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.