विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पालकमंत्री भुमरेंना दणका: बिडकीन- आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच

आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ठाकरे गटाचे बबन भावले, तर बिडकीन येथे अशोक धर्मे हे विजयी

औरंगाबाद,२० डिसेंबर / प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन आणि आडुळ ग्रामपंचायतीमध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सरपंच विजयी झाले आहेत.

पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेल्यामुळे भुमरेंना हा मोठा धक्काच  म्हणावा लागेल.

बिडकीन येथे प्रचार संपल्यानंतर भुमरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भुमरे यांच्यावर झाला होता. यावर मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जात नाही, असे म्हणत भुमरेंनी आरोप फेटाळले होते. याच बिडकीनच्या सरपचंपदाच्या निवडणुकीत भुमरेंच्या गटाला पराभव पत्करावा लागला आहे.