योग, तंदुरुस्ती आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान लोकप्रिय करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी अतिशय प्रोत्साहक भूमिका बजावली

मातृभूमी या मल्याळी दैनिकाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली,१८ मार्च /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  मातृभूमी या मल्याळी दैनिकाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याचे उद्‌घाटन केले.

या वृत्तपत्राच्या प्रवासातील सर्व प्रमुख व्यक्तींना पंतप्रधानांनी आदरांजली  वाहिली. महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळ देण्यासाठी मातृभूमीचा जन्म झाला”, असे ते म्हणाले. वसाहतवादी राजवटीविरुद्ध  आपल्या देशातील लोकांना  एकत्र आणण्यासाठी भारतभर स्थापन झालेली वृत्तपत्रे आणि नियतकालिकांच्या गौरवशाली परंपरेत त्यांनी या प्रकाशनाला स्थान दिले.भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या  कार्यात वृत्तपत्रांचा वापर करणाऱ्या लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले, श्यामजी कृष्ण वर्मा आणि इतरांची उदाहरणे त्यांनी दिली. आणीबाणीच्या काळात भारताची  लोकशाही मूल्य अबाधित ठेवण्यासाठी  एम.पी. वीरेंद्र कुमार यांच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष स्मरण केले.

स्वराज्यासाठीच्या  स्वातंत्र्यलढ्यात आपल्या   प्राणांची आहुती देण्याची संधी आपल्याला मिळाली नाही ” मात्र , हा अमृत काळ आपल्याला  सामर्थ्यशाली , विकसित आणि सर्वसमावेशक भारतासाठी  कार्य करण्याची संधी देतो”, असे ते पंतप्रधान  म्हणाले. नव्या भारताच्या  अभियानावर  माध्यमांचा असलेला सकारात्मक प्रभाव त्यांनी विशद केला.  स्वच्छ भारत अभियानाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, प्रत्येक माध्यम समूहाने  हे अभियान  प्रामाणिकपणे हाती घेतले.त्याचप्रमाणे योग, तंदुरुस्ती आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांना  लोकप्रिय करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी अतिशय प्रोत्साहक  भूमिका बजावली आहे.“हे राजकारण आणि राजकीय पक्षांच्या पलीकडील विषय आहेत. हे विषय येत्या काही वर्षात एक चांगले राष्ट्र बनवणार आहेत”,असे ते म्हणाले.

स्वातंत्र्य संग्रामातील कमी ज्ञात घटना आणि दुर्लक्षित राहिलेले स्वातंत्र्यसैनिक तसेच  स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित ठिकाणांना अधोरेखित करण्याच्या प्रयत्नांना प्रसारमाध्यमे चालना देऊ शकतात असे पंतप्रधानांनी यावेळी सुचवले. याचप्रमाणे,  प्रसारमाध्यमांशी संबंधित नसलेल्या उदयोन्मुख  लेखकांना व्यासपीठ प्रदान करण्यासाठी आणि ज्या भागात प्रादेशिक भाषा  बोलल्या जात नाहीत अशा  भागात या भाषांचा  प्रचार करण्याच्या दृष्टीने, वृत्तपत्र  हा एक उत्तम मार्ग असू शकतो असे त्यांनी सांगितले.

आजच्या काळात आणि युगात भारताकडून असलेल्या जगाच्या अपेक्षांबद्दल बोलताना,पंतप्रधान म्हणाले की, महामारीचा सामना करण्यात भारत असमर्थ ठरेल या सुरुवातीच्या अंदाजांना भारताने खोटे  ठरवले आहे. दोन वर्षांत 80 कोटी लोकांना विनामूल्य शिधा मिळाला .लसींच्या 180 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.“भारतातील प्रतिभावान तरुणांच्या बळावर, आपला देश आत्मनिर्भरता किंवा स्वयंपूर्णतेकडे  वाटचाल करत आहे. भारताला देशांतर्गत आणि जागतिक गरजा भागवणारे आर्थिक शक्ती  केंद्र  बनवणे हा या तत्त्वाचा गाभा आहे,” असे  पंतप्रधान म्हणाले. अभूतपूर्व सुधारणा आणल्यामुळे आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना विविध क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आल्या. भारताचे  स्टार्ट-अप कार्यक्षेत्र यापूर्वी  कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण नव्हते , असेही ते म्हणाले. गेल्या 4 वर्षांत, युपीआय  व्यवहारांची संख्या 70 पटीने वाढली आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनवर 110 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पीएम गतिशक्ती पायाभूत सुविधा निर्मिती आणि प्रशासन अधिक सुलभ  करणार आहे, अशी माहिती  मोदी यांनी दिली. आम्ही भारतातील प्रत्येक गावात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत. येणाऱ्या  पिढ्यांनी सध्याच्या पिढीपेक्षा  चांगली जीवनशैली जगावी हे आमच्या प्रयत्नांचे मार्गदर्शक तत्व आहे,”  असे त्यांनी सांगितले.