आयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता, ‘कोरोशुअर’ लाँच

युवकांच्या रचनात्मकतेला प्रेरणा देण्यासाठी उचललेले पाऊल – रमेश पोखरियाल ‘निशंक’

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2020
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज आयआयटी दिल्लीने विकसित केलेल्या आरटी-पीसीआर आधारित जगातला सर्वात स्वस्त, परवडणा-या किंमतीचा कोविड-19 निदान संच- ‘कोरोशुअर’ डिजीटल माध्यमाव्दारे लाँच केला. या संचाला ‘आयसीएमआर’ आणि ‘डीसीजीआय’ यांनी मान्यता दिली आहे. याप्रसंगी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे, आणि मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पोखरियाल म्हणाले, भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीच्या वतीने कोविड-19 साठी विकसित करण्यात आलेला निदान संच- ‘कोरोशुअर’ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोणाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. ते म्हणाले, देशाला सध्या स्वस्त, परवडणा-या किंमतीच्या आणि विश्वसनीय निदान संचाची आवश्यकता आहे. यामुळे कोविड महामारी नियंत्रणात आणण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. ‘कोरोशुअर’ निदान संच स्वदेशी आहे आणि याची किंमत इतर संचाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे. मनुष्यबळ विकास मंत्री यावेळी म्हणाले, पंतप्रधान नेहमीच देशातल्या युवकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. ‘स्वस्थ भारता’च्या निर्माणाची सुनिश्चिती करण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम पंतप्रधान करतात. आता कोविड-19 महामारीच्या काळामध्ये आपल्या नवीन संशोधनाने युवकांनी महत्वपूर्ण काम केले आहे. या निदान संचाला ‘आयसीएमआर’कडून उत्कृष्टतेचे गुण मिळाले आहेत आणि ‘डीसीजीआय’ने हा संच उच्च संवेदनशील आणि वैशिष्ठ्यपूर्ण असल्याचे नमूद करून मान्यता प्रदान केली आहे. 

आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधन कार्याबद्दल पोखरियाल यांनी त्यांचे कौतुक केले आहे. संच विकसित आणि निर्माण करण्याच्या कार्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांचे अभिनंदन केले आहे. कोविड-19 निदान संच विकसित करण्यासाठी आयआयटी दिल्लीच्या प्राध्यापक विवेकानंदन पेरूमल आणि त्यांच्या शोध पथकाची त्यांनी प्रशंसा केली आहे. या पथकामध्ये प्रशांत प्रधान (पीएच.डी स्कॉलर), आशुतोष पांडे (पीएच.डी स्कॉलर), प्रवीण त्रिपाठी (पीएच.डी स्कॉलर), डॉ. अखिलेश मिश्रा, डॉ. पारूल गुप्ता, डॉ. सोेनम धमिजा, प्रा. मनोज बी मेनन, प्रा. बिश्वजीत कुंडू आणि प्रा. जेम्स गोम्स यांचा सहभाग होता. 

या परवडणा-या किंमतीच्या संचामार्फत कोविड-19 महामारी संकटाच्या काळात देशाला अतिशय मदत मिळू शकणार असल्याचे पोखरियाल यांनी सांगितले. पोखरियाल यावेळी म्हणाले, दिल्ली एनसीआरमध्ये न्यूटेक वैद्यकीय उपकरणांच्याव्दारे हा तपासणीमुक्त निदान संच- कोरोशुअर निर्माण करण्यात आला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत असलेल्या प्रमुख शैक्षणिक संस्थेने अशा संकटाच्या काळामध्ये एका खासगी कंपनीच्या सहकार्याने अतिशय उपयुक्त संशोधन करून राष्ट्राच्या हिताचा विचार केला, याचे पोखरियाल यांनी कौतुक केले. आयआयटी दिल्लीने विकसित केलेल्या या निदान संचामुळे कोविडची चाचणी स्वस्त होऊ शकेल. अधिकृत परीक्षण प्रयोगशाळांनाही कोविड-19चे आरटी-पीसीआर पद्धतीने परीक्षण करण्यासाठी उपयोग होणार आहे. आरटी-पीसीआर पद्धतीने चाचणीसाठी 399 रूपये आधार मूल्य ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही तर आरएनए विलगीकरण आणि प्रयोगशाळांचे शुल्क त्यामध्ये धरण्यात आल्यानंतरही प्रत्येक परीक्षणाला येणारा सध्याचा खर्च याचा विचार केला, तर या कोरोशुअर संचाने निदान करणे अधिक स्वस्त होणार आहे. मंत्री ‘निशंक’ पुढे म्हणाले, आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून या निदान संचाची निर्मिती करण्याचा परवाना 10 कंपन्याना देण्यात आला आहे. 

आयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता

यावेळी बोलताना राज्यमंत्री धोत्रे म्हणाले, कोरोना विषाणू प्रसाराचे संकट लक्षात घेऊन आता व्यापक प्रमाणावर चाचण्या होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अतिशय कमी खर्चाच्या निदान संचाची निर्मिती हे मोठे यश म्हणावे लागेल. आयआयटी दिल्लीने अतिशय कमी कालावधीमध्ये हा संच विकसित केला आहे. त्यांनी नवसंकल्पना आणि उद्योजकता यांचा एकमेकांशी असलेला संबंध जाणून आत्मनिर्भर भारतासाठी सर्वात महत्वपूर्ण काम केले आहे. आयआयटीने केलेल्या कामगिरीमुळे देशातल्या सर्व शाळांनाही नवसंकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी वातावरण निर्मितीसाठी प्रेरणा देणारे कार्य ठरेल.

राज्यमंत्री धोत्रे पुढे म्हणाले, आयआयटी दिल्लीने गेल्या 40 वर्षांपासून अनेक ग्रामीण विकास कामांसाठी मदत ठरतील, अशी साधने विकसित केली आहेत. ग्रामीण जीवनाच्या पुनरूत्थानामध्ये ही संस्था महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे समाजातल्या अंतीम व्यक्तीलाही त्याचा लाभ मिळू शकतो. त्यांनी युवकांमध्ये नवसंकल्पना आणि उद्योजकता यांच्याविषयी खूप उत्साह असतो आणि त्यांच्या क्षमताही असतात, फक्त त्यांना योग्य वातावरण देवून त्यांच्या संकल्पनांना खत-पाणी घालण्याची आवश्यकता असते. त्यांना साधने आणि प्रेरणा मिळाली की, युवक नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणतात, असे वातावरण तयार करण्याचे काम आयआयटीने खूप चांगले केले असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. 

याप्रसंगी अमित खरे म्हणाले, रियल टाइम-पीसीआर आधारित निदान संच विकसित करून त्याला ‘आयसीएमआर’ची मान्यता मिळवणारी आयआयटी दिल्ली ही पहिली शैक्षणिक संस्था बनली आहे. ‘आयसीएमआर’च्यावतीने मान्यता देण्यात आलेली कोविड-19साठी पहिला परीक्षण-मुक्त निदान संच हा आहे. त्यांनी सांगितले की, सरकारच्या वैद्यकीय संशोधन संस्थांमध्ये 100 टक्के संवेदनशीलता आणि वैशिष्ट्यपूर्णतेची मान्यता या संचाला प्रदान करण्यात आली आहे. खरे यांनी समाजाच्या कल्याणासाठी आयआयटी दिल्लीने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरावेत, अशी कामना व्यक्त केली. 

आयआयटी दिल्लीचे संचालक प्राध्यापक व्ही. रामगोपाल राव यांनी यावेळी आयआयटी दिल्लीच्या स्वस्त संच विकसित आणि निर्माण करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि ‘आयसीएमआर’ यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. आपल्या संशोधकांनी कोविड-19 संबंधित संशोधन आणि विकास यावर लक्ष केंद्रीत करणे, यापुढेही सुरू राहणार आहे. कोरोना विषाणूच्या विरोधातली लढाई जिंकणे म्हणजे देशाबरोबरच संपूर्ण जगाला मदत ठरणार आहे, असे सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *