कोरोना रोखण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढे यावे, ‘जिंदगी, जान उसके बाद काम’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

नाट्य, चित्रपट क्षेत्रासह, मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रतिसाद

मुंबई, दि. ३ : – ‘ हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी नाट्य निर्माता, आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेच्या प्रतिनिधीनांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे, विषाणूबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधीनींही कोरोना रोखण्याच्या शासनाच्या सर्व प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा प्रतिसादही दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानातून मराठी नाट्य निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय आदी सहभागी झाले.

दृरदृश्य प्रणालीद्वारे दोन सत्रात झालेल्या या संवादात सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, उमेश कामत, नाट्य परिषदेचे प्रसाद कांबळी, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. त्यानंतरच्या चित्रपटगृह चालक-मालक संघटनांच्यावतीने निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी, कमल गियानचंदानी, अजय बिजली, नितीन दातार, देवांग संम्पत, कुणाल स्वाहनी, प्रकास चाफळकर, कपिल अग्रवाल, अजय बिजली, सिद्धार्थ जैन, अलोक टंडन, राजेश मिश्रा आदी सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले, कोरोनाशी लढा देताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शासनाची भूमिका आहे. तुमच्या व्यवसायाविषयी आत्मीयता आहे, म्हणूनच हा संवाद साधतो आहोत. स्थिती बिकट होते आहे. तुम्ही अपराधीपणाची भावना घेऊ नका. आता कुणाला जबाबदार धरणे, योग्य नाही. आता परिस्थितीत स्वीकारायलाच हवी. आता दोष कुणाचा हे शोधण्याची वेळ नाही. मास्क, अंतर राखणे, हात धुणे ही त्रिसूत्री पाळणे आवश्यक आहे. स्वयंशिस्त पाळली असती, तर आजची स्थिती आली नसती. लसीकरणातही आपण सर्वात पुढे आहोत. आम्ही केंद्राकडे अजूनही लस मागत आहोत. पण केंद्रालाही अन्य राज्यांनाही लस द्यावी लागत आहे. राज्यात चोवीस कोटी, पंचवीस कोटी लसींची मात्रा आवश्यक आहे. ती येईपर्यंत आपल्याला खबरदारी घ्यावीच लागेल. नुकसान तर पूर्ण राज्याचे होणार आहे. ‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ काम याप्रमाणे पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलावीच लागतील. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे लागतील. लोकांमध्ये कोरोनाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. भीती गेली हे चांगले झाले. पण त्यामुळे बेफिकीरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या वर्षभरात नाट्यक्षेत्रासह, चित्रपटसृष्टी आणि थिएटर्स चालकांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. हे मान्य आहे. संक्रमण रोखण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करत आहोत. तुम्ही नियमही पाळत आहात. पण स्वयंशिस्त कमी पडते आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. आपण टेलिआयसीयू सारख्या नवतंत्रज्ञानचा वापर करत आहोत. तरीही विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. घराघरात रुग्ण वाढत आहेत. कुटुंबं बाधित होत आहेत. त्यामध्ये अत्यवस्थ होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तुम्ही मनोरंजनातून जनजागृती करत आहात. त्यामुळे तुम्हालाही या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढे यावे लागेल. त्यासाठी सहकार्य कराल, ही अपेक्षा आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले, मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट व्यवसायाशी निगडीत लोकांची निर्बंधाने अडचण होणार आहे. परंतु रुग्णसंख्येतील वाढ पाहता नाईलाजाने काही निर्बंध लावावे लागणार आहेत. निर्बंध लावतांना मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या सूचनांचा निश्चितच विचार केला जाईल,असेही त्यांनी सांगितले.

थिएटर्स चालक-मालकांचे सहकार्य

नितीन दातार म्हणाले, तात्पुरत्या रुग्णालयांसाठी थिएटर्स, त्याठिकाणी असलेली मुबलक जागांमध्ये काही प्रमाणात व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. काही ठिकाणी खुर्च्या काढूनही आवश्यकता वाटल्यास व्यवस्था करता येईल.

कमल गियानचंदानी म्हणाले, शासनाला पूर्ण सहकार्य करू. जनतेच्या राज्याच्या हितासाठी जो कोणता निर्णय घ्याल, त्याला पाठिंबाच राहील.

रोहित शेट्टी म्हणाले, सरकार जो निर्णय घेईल, त्याच्या सोबत राहू. आपल्या प्रेक्षकांनाही त्रास होतो आहे. एकजुटीने शासनासोबत राहू. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. वेळोवेऱी परिस्थितीचे पुनरावलोकनही केले जावे.

यावेळी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते राज्य शासनासोबत असून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले.

कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा; माध्यमांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि ३ : कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज वृत्तपत्रांचे  संपादक, मालक, वितरक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले व सूचना स्वीकारल्या.

संसर्गाचे राजकारण रोखा

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते गांभीर्याने पाळल्याने साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या  सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊ यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्याकामी  माध्यमांनी सहकार्य करावे.

आज आपण ऑक्सिजन उत्पादन कसे वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र-करार स्वरूपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल, त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई- आयसीयूचा उपयोग कसा करता येईल, तेही पाहतो आहोत. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनीदेखील त्यामागील हेतू पाहावा व वस्तुस्थिती मांडावी.

या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर, टेलिमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना विक्रीची परवानगी, कोविड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणे, वारंवार जनतेशी संवाद साधणे अशा विविध सूचना देण्यात आल्या.

कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांना राज्यातील जिम चालकांचा एकमुखाने पाठिंबा

पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची ‘जाग’ आयुष्यभरासाठी जपूया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ३ :-  आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ‘जान है तो जहान है..’या उक्तीनुसार जीव राहिला, तर पुढे आपण व्यायाम करू शकणार आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल. त्यामध्ये व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तिनिशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

राज्यातील व्यायाम शाळांचे मालक, संचालक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना परिस्थितीबाबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय यांच्यासह महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनेचे अध्यक्ष निखिल राजपुरीया, करण तलरेजा, अभिमन्यू सावळे, योगिनी पाटील, गुरूजीत सिंह, शालिनी भार्गव, खजानीस महेश गायकवाड, हेमंत दऱडे, राजेश देसाई, श्री. परुळेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, व्यायाम शाळा-जिम चालकांना यापूर्वी ज्या काही सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन होत आहे, ही गोष्टी चांगली आहे. पण आता आपण गतवर्षीच्या पूर्वपदापेक्षाही जास्त बिकट परिस्थितीकडे गेलो आहेत. गेल्यावेळी ज्याला आपण ‘पिक’ परिस्थिती म्हणत होतो. त्याहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटी मुंबईत तीनशे साडेतीनशे रुग्ण आढळत होते. ती संख्या आता साडेआठ हजारांवर गेली आहे. जिममध्ये तुम्ही सर्व सुविधा आणल्या, ट्रेड मिल आणल्या, उपकरण आली, पण चांगला प्रशिक्षक नसेल, तर काय होईल, तशीच स्थिती आता निर्माण होऊ शकते. बेड्स, व्हेंटिलेटर्स, औषधांचा साठा सगळ्या काही गोष्टी सुरळीत करत आहोत. पण डॉक्टर्स, नर्सेस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे कठीण होणार आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जगाने लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारला आहे. आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, आपली सर्व यंत्रणा कोरोनावर काम करते आहे. रुग्ण शोधणे, त्यांचे ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंगसाठी आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणा अथकपणे प्रयत्न करत आहेत. आपण अनेक सुविधा वाढविल्या आहेत. पण रुग्णवाढीमुळे त्याही कमी पडतील की काय अशी शक्यता आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची संख्या कमी पडू लागली आहे. आहे. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांनाच कोरोनाच्या विरोधात एकजुटीने काम करावे लागेल. हे काम एकतर्फी होऊ शकत नाही. परिस्थिती अशीच राहीली, तर राज्य गर्तेत जाईल. यापूर्वीही निर्बंध आपण हळूहळू लावले होते, आणि पुन्हा हळूहळू शिथिल केले होते. तशीच वेळ आली, महाराष्ट्राच्या हिताचा मार्ग स्वीकारायला हवा. जो निर्णय घेऊ सगळ्यांच्या हितांचा असाच असेल. त्यामध्ये सगळ्यांनी सर्वांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करावे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिम संचालक एसओपीचे पालन करत आहेत, हे प्रशंसनीय आहे. बऱ्याच जिम, ज्या विशेषतः छोट्या जागेत आहेत. त्याठिकाणी संक्रमण होण्याची शक्यता आहे. जान है, तो जहान है. त्यामुळे आपल्याला जीवाची काळजी घ्यावी लागेल. पण रुग्णांची संख्या ज्या गतीने वाढते. ते पाहता, अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळणे अवघड होईल. बऱ्याच छोट्या शहरात तज्ज्ञ डॉक्टर्स, आणि उपकरण उपलब्ध नाही. त्यामुळे ही गोष्टही जिम चालकांनी लक्षात घ्यावी. आपण ई-आयसीयू, लसीकरण यामध्ये नवीन पावले टाकतो आहोत. लसीकरणाचे प्रमाण तिप्पट करत आहोत. या सगळ्या गोष्टी करत आहोत. पण आपल्याला या चिंताजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागतील. यात स्वयंशिस्त हीच महत्त्वाची आहे. यासाठी राज्यसरकारला सहकार्य करावे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनीही जिम चालकांना राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री आणि शासन घेईल, त्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मुख्य सचिव श्री. कुंटे म्हणाले, व्यायाम शाळा, जिमच्या ठिकाणी व्यायामामुळे श्वसनक्रिया आणखी वेगाने होते. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण आणि घालून दिलेल्या नियमांचे आणखी काटेकोर पालन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

असोसिएशनचे सरचिटणीस, साईनाथ दुर्गे यांनी प्रास्ताविक केले. असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजपुरिया म्हणाले, ऑक्टोबरपासून जिम सुरु झाले, त्यावेळेपासून आतापर्यंत दिलेल्या एसओपीचे पालन केले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आपल्याकडून यापुढे दिल्या जाणाऱ्या निर्देशाचे जरूर पालन करू.

श्री. देसाई, श्रीमती भार्गव, श्री. परुळेकर, आदींनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱे निर्देश काटेकोरपणे पाळले जातील. कोरोना विरोधातील या लढ्यात आम्ही सर्व शासनासोबत आहोत, असे सांगितले.