मुंबई पोलीस खंडणी रॅकेटचा तपास करणार – संजय राऊत

ईडीनंतर आता आयटीची भानामती

मुंबई ,८ मार्च / प्रतिनिधी :-देशात ईडीनंतर आता आयकर विभागाची भानामती सुरू असल्याचा घणाघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ईडी म्हणजे भाजपची एटीएम मशीन असून, ईडीने आतापर्यंत सर्वात जास्त धाडी महाराष्ट्रात टाकल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत मुंबईतील प्रत्येक वॉर्डात आणि शिवसेनेच्या शाखांमध्ये आयकर खात्याच्या धाडी पडत राहतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. आज सकाळपासून शिवसेनेच्या नेत्यांवर आयकर खात्याच्या धाडी पडत आहेत. एखादी भानामती होते तशा या धाडी पडत आहेत. आयकर खात्याला आता एवढंच काम उरलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबईत सकाळपासून बऱ्याच हालचाली सुरु आहेत. त्यामुळे आता आम्हीही एक रेड टाकायची ठरवली आहे. मुंबई हे आमचं घर आहे. या घरात कोणी घुसत असेल तर शिवसेनेलाही घुसण्याचा आणि घुसवण्याचा अधिकार आहे. फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच निवडक लोकांना केंद्रीय तपासयंत्रणांकडून लक्ष्य केले जात आहे. तर आयकर खात्याकडून मुंबईतील शिवसेना नेत्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. आयकर खात्याला आता एवढंच काम उरले आहे. मीदेखील ईडी आणि आयकर खात्याला ५० नावं पाठवली होती. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रेही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली होती. माझ्याकडे आणखी काही कागदपत्रे आहेत. ही कागदपत्रे मी टप्याटप्याने उघड करेन, असे संजय राऊत यांनी म्हटले.

देशातील सर्वात मोठा ईडीचा हा घोटाळा आहे. पुढच्या काळात आणखी काही घोटाळे आपण उघड करणार आहोत. यामध्ये कुणाला काय मिळालं हे सुद्धा सांगणार आहोत असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी ईडीच्या लोकांचा आणि किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे असं विचारत जीतेंद्र नवलानी हे कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे. जितेंद्र नवलानी हे ईडीचं रॅकेट चालवतात असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. ईडीचे अधिकारी जितेंद्र चंद्रलाल नवलाल यांच्या 7 कंपन्या असून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली गेली आहे. एवढेच नव्हे तर, खंडणीतून वसूल केलेले हे पैसे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आल्याचेही राऊत म्हणाले. ईडीचे एजंट पैसे वसूल करत असून याबाबतची माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

या प्रकरणात आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून, ते आता चौकशी सुरु करणार आहे. राज्यात ईडीकडून व्यावसायिक आणि बिल्डरांना धमकावण्याचं काम सुरु आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेला गेल्यावेळप्रमाणे फारशी गर्दी नव्हती. शिवसेना भवनात केवळ मोजके नेते उपस्थित होते. खासदार अरविंद सावंतही याठिकाणी हजर होते. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्राच्या प्रती सगळ्यांना वाटल्या. काही लोकं कागद मागतात, म्हणून मी आज तुम्हाला कागदपत्रं देत आहे. मी आजपर्यंत तपास यंत्रणांना हजार कागदपत्रं दिली असतील पण कोणतीही कारवाई झाली नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.