राज्यातील प्राथमिक शाळा सुरु करण्यास हरकत नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई ,१७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- राज्यात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांपुढे व्यक्त केले आहे.

शालेय शिक्षण मंत्र्यांनी प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत मागितलेल्या अभिप्रयावर आरोग्य विभागाने होकार दिला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विश्वासात घेऊन यावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर करु, असे राजेश टोपे म्हणाले.

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशातच नाही तर जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यात यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण प्रशासनाशी चर्चा करून ३० नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक व्यक्तीला लशीचा किमान एक डोस मिळालेला असावा, अशी भूमिका घेतली आहे. ‘मिशन कवच कुंडल’ या मोहीमेअंतर्गत लसीकरणासाठी जनजागृती करण्याचे काम हे घराघरात जाऊन होत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.तसेच वेगवेगळ्या समाजांमध्ये लसीकरणाचे प्रबोधन करण्यासाठी धर्मगुरु, मौलवी, स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी करण्यात येत आहे. यामध्ये कोणी सेलेब्रिटी सहभाग घेत असेल तर ते कोण्या एका समाजाचे सेलिब्रिटी नसतात अशी भूमिका त्यांनी अभिनेता सलमान खान याला ब्रँड अँम्बेसिडर करण्याच्या मुद्द्यावर मांडली. यामध्ये कुठेही राजकारणाचा लवलेश नाही असे सांगत देशात कोरोना संक्रमाची सुरूवात झाल्यापासून यात कोणतेही राजकारण नको, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली असल्याची आठवण त्यांनी करुन दिली. लसीकरणात कोणतेही धार्मिक राजकारण न करता लसीकरण लवकरात लवकर कसे पूर्ण होईल, हा मुख्य हेतू ठेवायला हवा, असे आरोग्य मंत्री म्हणाले.