सुडाचे राजकारण करणाऱ्यांना राष्ट्रवादी व्याजासह परत करणार – शरद पवार

तपास यंत्रणांच्या धाडीवरुन पवारांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

नागपूर ,१७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे विदर्भ दौऱ्यात आहेत, आज रात्री नागपुरात बोलताना विरोधी पक्षाला त्यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. सत्ता काही लोकांच्या डोक्यात गेली आहे, म्हणून त्यांनी सुडाचं राजकारण सुरु केलं आहे, याचा मोबदला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्याजासह परत करतील. 

Image

अनिल देशमुख यांच्या प्रत्येक त्रासाचा एक एक मिनिट वसूल करु, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा नागपूर दौरा होत असे, तेव्हा अनिल देशमुख सोबत असायचेच. असा एकही दौरा टळला नाही. पण आज अनिल देशमुख आत आहेत. अनिल देशमुख यांनी मला वास्तव सांगितले आहे. म्हणून अनिल देशमुख हे पुन्हा सक्रीय होतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुख हे पुन्हा त्यांच्या जागी येतील आणि सक्रीय होतील असं म्हटलं आहे. तर शरद पवारांनी अनिल देशमुख आत आहेत, आणि आरोप करणारे परमबिर सिंग आहेत तरी कुठे?, असा सवाल केला आहे.

Image

तपास यंत्रणांच्या धाडीवरुन पवारांचा भाजपवर निशाणा

तसंच राज्य सरकारनं जाहीर केलंय की परमबीर सिंग भगोडा आहे. परमबीर यांनी केलेले आरोप खोटे आहेत. खोटे आरोप करणारा अधिकारी बाहेर आहे आणि अनिल देशमुख आत आहेत. सत्ता गेली म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. ते केंद्राकडे लिस्ट पाठवतात आणि त्याची चौकशी करायला सांगतात. संजय राऊत यांच्या पत्नीली ईडीची नोटीस बजावली. अजित पवार यांच्याबद्दल काही करता येत नाही. म्हणून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांच्या बहिणीच्या घरात धाडसत्र सुरु केलं. अजित पवार यांच्या घरी आयटीचे लोक पाच दिवस बसले. ते दिल्लीचे आदेश होते. हसन मुश्रीफ यांच्याबद्दल चौकशी करतात. महाराष्ट्र राज्य हातचं गेलं, ते परत मिळत नाही. म्हणून ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातो. तुम्ही कितीही त्रास द्या. सामान्य जनता तुम्हाला कहीही सत्तेत येऊ देणार नाही. जनता आज ना उद्या वसूल करेल, असा घणाघात पवारांनी केलाय.

राज्य आणि देशातील विविध घडामोडींबाबत शरद पवारांची मते 

त्रिपुरा राज्यातील घटनेचे पडसाद उमटून अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये काही समस्या उद्भवली. समस्या कुठलीही असो त्यावर अशी प्रतिक्रिया उमटणे योग्य नाही. हिंसेच्या घटना घडवण्यासाठी कायदा हातात घेणं योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जायला हवी.

अशा गोष्टींचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीसोबत काहीही संबंध नाही, मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो. ज्यांची दुकानं फोडली त्यांचा काय दोष? त्रिपुरातील घटनेत व्यापाऱ्यांचा काय दोष?

हिंसक घटनांमध्ये दुकानांचं नुकसान झालं. प्रभावित झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांना मदत देण्यासाठी सरकारने काही धोरण तयार करण्याची गरज आहे.

राज्य चालवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्य चालवण्याची संधी मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्याकडे पाहावं लागतं. पण मुख्यमंत्री ज्या भागातून आला त्या भागाकडे जास्त कल असतो. विदर्भातील माजी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या.

समस्या काय आहे ती पाहून सोडवायची असते, पक्ष पाहून नाही. पण असे फार कमी नेते उरले आहेत. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी हे असे व्यक्तिमत्व आहेत. विकासकामं करताना ते पक्ष पाहत नाहीत. त्यांच्या समोर समस्या आल्या की त्याचा तोडगा ते काढतात.

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढणार का हे आत्ताच सांगता येणार नाही. पण आघाडी केलेले पक्ष एकत्र लढले तर नक्कीच फायदा होईल, असे मला वाटते.