तीन लाखांची रोकड घरी घेऊन जाणार्‍या व्यापार्‍याच्या हातातील बॅग हिसकावल्याप्रकरणी आरोपींना सक्तमजुरी

औरंगाबाद,५ मार्च / प्रतिनिधी :-तीन लाखांची रोकड घरी घेऊन जाणार्‍या व्यापार्‍याच्या हातातील बॅग दुचाकीस्वारांनी हिसकावल्याप्रकरणी आरोपी विष्णुसिंग उर्फ विशाल सिंग प्रमोद सिंग (28, रा. सईनगर, जि. आग्रा उत्तर प्रदेश, ह.मु आनंदनगर, घोडबंदर ठाणे), सोनुसिंग उमाशंकरसिंग (28, रा. राजगढ, ता. मडियाना जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश), व संदिप सत्तु सोनकर (26, रा. सोनभद्र ता. घोरावल उत्तर प्रदेश) या तिघांना दोन वर्षे आठ महिने सक्तमजुरी आणि विविध कलामांखाली नऊ हजारांच्‍या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्ही. सपाटे ठोठावली.

विशेष म्हणजे खटल्याच्‍या सुनावणीवेळी साक्षीपुराव्‍यात फिर्यादी विठ्ठल उर्फ प्रल्हाद मोरे (४४) हा आपल्या जबाबावर कायम होता. मात्र त्‍यानंतर फिर्यादी व आरोपी यांच्‍यात तडजोड झाली. उलट तपासणी वेळी फिर्यादी फितुर झाला. ही बाब न्‍यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्‍यायालयाने तडजोड अमान्‍य क‍रित फिर्यादीला खोटी साक्ष दिल्याबद्दल कारवाई का करण्‍यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली.

हर्सुल परिसरातील धनगरगल्ली येथे राहणारे विठ्ठल उर्फ प्रल्हाद मोरे (४४) यांचे कपड्याचे दुकान असुन त्यांनी अ‍ॅक्सेस बँकेतून सात लाखांचे कर्ज काढले होते. त्यापैकी तीन लाख रुपये ७ जून २०१९ रोजी दुपारी मोरे यांनी काढले होते. ही रक्कम घेवून ते कारने (एमएच-२०, एफजी-०१५०) घरी निघाले. घराच्या बाजुला त्यांनी गाडी उभी केली. व गाडीमधील तीन लाख रुपये असलेली बँग, मोबाईल चार्जर व इतर साहित्य घेत त्यांनी कार लॉक केली. ते घराकडे जाणार तेवढ्यात दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी पैशांची बॅग हिसकावून घेत धुम ठोकली. प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणात तत्‍कालीन सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्‍याच्‍या सुनावणीवेळी विशेष सहायक सराकरी वकील सय्यद शहनाज यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात फिर्यादीच फितुर झाला. दरम्यान दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. आरोपी विष्‍णुसिंग उर्फ विशाल सिंग याला भांदवी कलम ३७९ अन्‍वये २ वर्षे आठ महिने, २००० दंड, सोनूसिंग याला भादंवी कलम ३७९ अन्‍वये २ वर्षे आठ महिने, २००० दंड, कलम ४६५ अन्‍वये दोन वर्षे १५०० दंड, ४६६ अन्‍वये २ वर्षे आठ महिने, प्रत्‍येकी १००० दंड, संदिप सोनकर याला कलम ४६५ अन्‍वये दोन वर्षे, १५०० दंड, आणि कलम ४६६ अन्‍वये दोन वर्षे आठ महिने, १००० दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस नाईक रहिस शेख यांनी काम पाहिले.