धांड नदीचे पाणी गिरजा मध्यम प्रकल्पात वळते करा-आ.सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी

औरंगाबाद,५ मार्च / प्रतिनिधी :-खुलताबाद तालुक्यातील धांड नदीचे पाणी गिरजा मध्यम प्रकल्पात वळते करावे, यासाठी बाजार सावंगी ते गिरजा मध्यम प्रकल्पादरम्यान 2.5 कि.मी. लांबीचा कॅनॉल करण्यासंदर्भात शासनाने त्वरीत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज  विधान परिषदेत केली.

     खुलताबाद तालुक्यातील धांड नदीचे पाणी गिरजा मध्यम प्रकल्पात वळते करण्यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. गिरजा मध्यम प्रकल्पाचे बांधकाम 1987 मध्ये पूर्ण करण्यात आले. मात्र मागील 33 वर्षात हा प्रकल्प केवळ तीन वेळाच पूर्ण क्षमतेने भरला भरला. बाजार सावंगी ते गिरजा मध्यम प्रकल्पादरम्यान 2.5. कि.मी. कॅनॉल तयार करून धांड नदीचे पाणी वळते केल्यास गिरजा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल. शिवाय तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल असे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. जलसंपदा मंत्री म्हणून आपण मराठवाड्याला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तज्ञांनी दिलेल्या आकडेवारीवर विसंबून न राहता धांड नदीचे पाणी गिरजा मध्यम प्रकल्पात वळते करण्यासाठी बाजार सावंगी ते गिरजा प्रकल्पादरम्यान 2.5.कि.मी. लांबीचा कॅनॉल करण्यासंदर्भात त्वरीत निर्णय घ्यावा अशी आग‘ही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सभागृहात केली.

     यासंदर्भात आ.सतीश चव्हाण वेळोवेळी शासनस्तरावर पाठपूरावा करत आहेत. यापूर्वी त्यांनी 20 ऑक्टोबर 2021 रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन बाजार सावंगी ते गिरजा मध्यम प्रकल्पदरम्यान 2.5 कि.मी.लांबीचा कॅनॉल कार्यान्वित व्हावा यासाठी आपल्या अधिपत्याखाली संबंधित अधिकार्‍यांसह बैठक आयोजित करण्याची देखील मागणी केली होती.