संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

ओरोस : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी (९ फेब्रुवारी) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. नितेश राणे यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मिळाला आहे.

मंगळवारी (८ फेब्रुवारी) जामीन मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांचे वकिल, जेष्ठविधीतज्ज्ञ सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत, वकील साळवी यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज निर्णय देतो असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला.दरम्यान, नितेश राणेंना साक्षीदारांवर दबाव आणता येणार नाही, याशिवाय आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे.

जामीन मिळूनही नितेश राणेंची आजची रात्र रुग्णालयातच

नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याचे आणि रात्र उलट्या झाल्याचे सांगत डॉक्टरांनी अँजिओग्राफी करण्याचं ठरवलं. सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर चार डॉक्टरांच्या उपस्थितीत अँजिओग्राफी टेस्ट होणार होती. मात्र आता ती रद्द झाल्याने त्यांना आजची रात्रही रुग्णलायात काढावी लागणार आहे.

नितेश राणे यांना उच्च रक्तदाब आणि चक्कर येत असल्याने सिटी अँजिओग्राफी आज करण्यात येणार नाही, असे कारण कोल्हापुरातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे राणेंची चिंता वाढली आहे. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर सिटी अँजिओग्राफी आज न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जामीन मंजूर मिळाल्याचे पत्र अद्याप सीपीआर रुग्णालयाला मिळालेले नाही अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवासांपासून नितेश राणेंची तब्येत अस्थिर आहे. त्यांच्यावर छातीत दुखत असल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री उलट्याही झाल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.

“आज आनंदाचा दिवस आहे”

माजी खासदार निलेश राणे म्हणाले, “नितेश राणे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला याचा आनंद आहे. सगळ्याच गोष्टी आज बोलून उपयोग नाही. ही सर्व कोर्टाची प्रक्रिया होती. त्यात आज जामीन मिळाला. काय काय घडलं हे बोलायची वेळ आज नाही. कोर्टाने जामीन मंजूर केलाय. आज आनंदाचा दिवस आहे.”