मंत्रिमंडळ निर्णय:मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार

मुंबई ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे. परंतू राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना यामुळे ही निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने प्रशासक नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील.

राज्यात माहिती केंद्र तयार करण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. राज्यात माहिती केंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण आठ माहिती केंद्र तयार करताना पहिल्या टप्प्यात कोकण विभागात रायगड येथे माहिती केंद्र तयार करण्यात येईल, असे नवाब मलिक म्हणाले. पुढील महत्त्वपूर्ण निर्णय हा मुंबई महानगरपालिकेच्या मुदतीबाबत घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेची सात मार्चला मुदत संपत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेला कोणतीही मुदतवाढ देता येत नाही. अशावेळी प्रशासक नेमण्याची इतर महानगरपालिकेच्या कायद्यात तरतूद आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेत प्रशासक निवडण्याची तरतूद नसल्याने कायद्यात बदल करून सात मार्चनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा निर्णयावर राज्यपाल महोदयांनी मान्यता दिल्यावर अध्यादेश काढण्यात येईल, असे मलिक यांनी सांगितले.

राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार

राज्यात विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांच्या इमारती व माहिती भवन उभारुन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिक बळकटीकरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

माहिती जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाते. या महासंचालनालयाच्या अंतर्गत आठ विभागीय माहिती कार्यालये आहेत. परंतू बहुतांश माहिती कार्यालये भाड्याच्या जागेत असून अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे अशा सर्व अधिनस्त माहिती कार्यालयासाठी स्वत:ची जागा मिळवून, कार्यालयाची इमारत बांधकाम, बळकटीकरण, पायाभूत सुविधा निर्मिती करण्यासाठी विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, माहिती भवन इमारत बांधकाम योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती शासकीय जमिन प्राप्त करुन घेण्यात येईल.

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ करण्याचा निर्णय निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

आदिवासी लोकसंख्या 1500 पेक्षा जास्त असलेल्या भागात 75लाख रुपये, 1000 ते 1499 पेक्षा जास्त असलेल्या भागात 50 लाख रुपये, 500 ते 999 पेक्षा जास्त असलेल्या भागात 35 लाख रुपये, 499 पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या 25 लाख रुपये अशा सुधारीत आर्थिक निकषांमध्ये 5 वर्षांपर्यंत कामे घेता येतील.

“ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा” ही योजना सन 2021-22 पासून राज्यस्तरावर वर्ग करण्यात आली आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र,माडा,मिनीमाडा व आदिवासी उपयोजना बाह्य  क्षेत्राबाहेरील  50 टक्के व त्यापेक्षा जास्त अनुसुचित जमातीची  लोकसंख्या असलेल्या वस्त्या / पाडे / वाड्या / गाव/ नगर पंचायती / नगरपरिषदा /नगरपालिका /महानगरपालिका या मधील वार्ड/प्रभाग यांचा विकास करण्याबाबत सुचविण्यात येणाऱ्या कामांना सुधारीत निकष लावण्यात येतील.

भारतरत्न लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

भारतरत्न लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वाचला. यावेळी सर्वांनी स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली.