गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली, लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारलं जाणार

मुंबई ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आलीय. लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारलं जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केलीय. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

Image
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन लता दिदींच्या हस्ते होणार होते मात्र, दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. परंतु, लता दिदींचे स्वप्न पूर्ण करणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज मंगेशकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी, उषाताई, आदिनाथ जी, मयूरेश पै उपस्थित.

संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठातील जागा द्यावी अशी शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खूप इच्छा होती. पण आता जमीन मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे. त्या महाविद्यालयाला भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी आज केलीय. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या दृष्टीने तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण कालच लतादीदींच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत म्हणाले.