महामारीच्या संकटात 80 कोटी लोकांना पुरवला मोफत अन्नधान्याचा पुरवठा -पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधानांनी राज्य सभेत धन्यवाद प्रस्तावाद्वारे दिलेले उत्तर

भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे जिचा मध्यम चलनफुगवठ्यासह उच्च विकास

Image

नवी दिल्ली ,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या संसदेप्रती उद्देशून केलेल्या अभिभाषणाला धन्यवाद प्रस्तावाद्वारे उत्तर दिले. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा आपला देश स्वातंत्र्य प्राप्तीची 100 वर्षे साजरी करेल त्या वेळेपर्यंत आपण देशाला कुठे पोहोचविणार आहोत आणि देशाची प्रगती कशी साधणार आहोत ह्यावर विचार करण्याची ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे.  यासाठीचा निश्चय पूर्ण करण्यासाठी आपल्याला सामायिक भागीदारी आणि सामायिक मालकी हक्काची भावना जागविण्याची गरज आहे याबद्दल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले की, जग अजूनही कोविड-19 महामारीशी लढा देत आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये मानवजातीने अशा प्रकारच्या आव्हानाला तोंड दिलेले नाही. भारतातील नागरिकांनी केवळ स्वतःच्या संरक्षणासाठी नव्हे तर इतरांना देखील या महामारीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेतले आहे. जगभरातील अनेक लसीकरण विरोधी विचारसरणींच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वर्तन कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

या महामारीच्या काळात लोक भारताच्या प्रगतीबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु भारताने 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन मिळावे याची खातरजमा केली आहे.  गरिबांसाठी विक्रमी दराने घरे बांधली आहेत, या घरांना पाणीजोडणी असावी याचीही खातरजमा करण्यात आली असे पंतप्रधान म्हणाले. या महामारीच्या काळात आम्ही 5 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी पुरवले आहे आणि नवा विक्रम केला आहे. आमच्या तर्कशुद्ध दृष्टिकोनामुळे आपल्या शेतकऱ्यांनी महामारीच्या काळात भरघोस पीक घेतले. आम्ही महामारीच्या काळात पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प पूर्ण केले कारण आम्हाला विश्वास आहे की (पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प) ते अशा आव्हानात्मक काळात रोजगाराची खात्री देतात. या महामारीच्या काळात आपल्या तरुणांनी क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि देशाचा गौरव वाढवला आहे.  भारतीय तरुणांनी त्यांच्या नवउद्यमांसह (स्टार्ट-अप्ससह) भारताला जगातील पहिल्या तीन नवउद्यम गंतव्यस्थानांपैकी एक बनवले आहे.

या महामारीच्या काळात कॉप 26 किंवा जी20 संबंधित विषय असो किंवा 150 हून अधिक देशांमध्ये औषधांच्या निर्यातीशी संबंधित असो, भारताने नेतृत्वाची भूमिका बजावली आहे आणि संपूर्ण जग यावर चर्चा करत आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. महामारीच्या काळात एमएसएमई क्षेत्र आणि कृषी क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले यावर पंतप्रधानांनी जोर दिला.

रोजगाराची आकडेवारी देताना पंतप्रधान म्हणाले की 2021 च्या कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकडेवारीवरून असे दिसून येते की सुमारे 1 कोटी 20 लाख नवीन लोकांनी ईपीएफओ ​​पोर्टलवर स्वतःची नोंदणी केली आहे. या सर्व औपचारिक नोकर्‍या आहेत आणि यापैकी सुमारे 60 ते 65 लाख 18 ते 25 वयोगटातील आहेत, याचा अर्थ ही त्यांची पहिली नोकरी आहे. 

महागाईवर बोलताना पंतप्रधान म्हणाले की आम्ही महागाई रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि जेव्हा आपण इतर अर्थव्यवस्थांशी तुलना करतो तेव्हा आपण असे म्हणू शकतो की आज भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे जिचा मध्यम चलनफुगवठ्यासह उच्च विकास झाला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आपण कोणत्या मार्गावर आहोत याची पर्वा न करता आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे. विरोधी पक्षात राहणे म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम थांबवणे ही मानसिकता चुकीची आहे. पंतप्रधान म्हणाले की काही सन्माननीय सदस्यांनी सांगितले की भारताची लसीकरण मोहीम ही मोठी गोष्ट नाही तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले की, महामारीच्या सुरुवातीपासूनच सरकारने देशात आणि जगामध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक संसाधनाचे एकत्रीकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. महामारी संपुष्टात येईपर्यंत आम्ही देशातील गरिबांचे रक्षण करू, असे आश्वासनही त्यांनी सर्वांना दिले.

पंतप्रधान म्हणाले की, कोविड-19 विरुद्ध लढा मजबूत आणि सौहार्दपूर्ण संघीय संरचनेशी देखील जोडलेला आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत 23 बैठका झाल्या आहेत. कोविड-19 मुद्द्यावर आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी त्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणाले की, आज आयुष्मान भारत अंतर्गत देशात 80 हजाराहून अधिक आरोग्य आणि कल्याणकारी केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे गावाजवळ आणि घराजवळ मोफत चाचण्यांसह उत्तम प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवत आहेत.

लोकशाहीवर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 1975 साली ज्यांनी लोकशाही पायदळी तुडवली त्यांच्याकडून आपण लोकशाहीचे धडे कधीच शिकणार नाही. आपल्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका घराणेशाही असलेल्या पक्षांचा आहे. जेव्हा राजकीय पक्षात एक कुटुंब खूप प्रचलित होते, तेव्हा राजकीय प्रतिभेला हानी पोहोचते. 

पंतप्रधान म्हणाले, “काही सदस्यांनी विचारले- जर काँग्रेस नसती तर काय झाले असते?” “मला सांगायचे आहे की, काँग्रेस नसती तर आणीबाणी नसती, जातीचे राजकारण नसते, शीखांची कधीही हत्या झाली नसती, काश्मिरी पंडितांच्या समस्या उद्भवल्या नसत्या,” असे ते म्हणाले.

राष्ट्रीय प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा यांच्यात कोणताही संघर्ष आम्हाला दिसत नाही, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. देशाचा विकास लक्षात घेऊन प्रादेशिक आकांक्षांना संबोधित केल्यास भारताची प्रगती अधिक मजबूत होईल. जेव्हा आपली राज्ये प्रगती करतात तेव्हा देशाची प्रगती होते, असेही ते म्हणाले.

भेदाची परंपरा संपुष्टात आणून एकाच मानसिकतेने वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. एक सुवर्ण काळ आणि संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे आणि आपण ही संधी गमावू नये असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.