शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, आयएएस अधिकारी अटकेत

पुणे,२९ जानेवारी / प्रतिनिधी :-  शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने शालेय शिक्षण, क्रीडा विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना शनिवारी ठाण्यातून अटक केली. मंत्रालयातील आयएसएस दर्जाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. खोडवेकर याला दुपारी अटक केल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 31 जानेवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Image

सुशील खोडवेकर 2009 च्या बॅचचा आयएएस अधिकारी असून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून काम केलं आहे. सध्या खोडवेकर कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहे. टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र, शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याने सुशील खोडवेकरच्या सांगण्यावरून जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले. त्यानंतर या कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट त्यांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात खोडवेकरने आर्थिक व्यवहार केल्याचीही माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 2018 मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू आहे.

टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक करणअयात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आता 2018 च्या घोटाळ्यातील आरोपी सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली. ही परीक्षा 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळची परीक्षा नियंत्रक म्हणून सुखदेव डेरे यांच्याकडे चार्ज होता. आम्ही त्यांना अटक केली आहे. यापूर्वीच आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी घोटाळा प्रकरणी जी ए टेक्नॉलॉजीचे आश्विनकुमार होते, त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रीतिश देशमुख, हरकळचे दोन्ही भाऊ आणि सावरीकर यांनाही अटक केली आहे.

गैरप्रकारात सामील :  अटकेत असलेले आरोपी अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यात खोडवेकर गैरव्यवहार प्रकरणात सामील असल्याचे आढळून आले आहे. शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडून झालेल्या गैरवर्तनाची चौकशी करण्यात येत होती. खोडवेकर यांच्याकडे चौकशीची जबाबदारी होती. खोडवेकर यांनी त्यांना मोकळीक दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या बंगळुरूतील जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीकडून करण्यात आलेल्या चुकांमुळे काळय़ा यादीत समाविष्ट करण्यात आले होते. या कंपनीस काळय़ा यादीतून बाहेर काढण्याची सूचना खोडवेकर यांनी सुपे यांना दिली होती. अपात्र उमेदवारांना पात्र ठरवून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. खोडवेकर यांची चौकशी करायची असून त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अ‍ॅड. विजय  सिंह जाधव यांनी युक्तिवादात न्यायालयाकडे केली.