यवतमाळ जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत अग्रेसर ठेवण्यासाठी कटिबद्ध-पालकमंत्री संदिपान भुमरे यांची ग्वाही

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असतांना जनतेच्या कल्याणाची अधिकाधीक कामे झाली पाहिजे, अशी आपली भूमिका असून यासाठी जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या योजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी दिली.

May be an image of 12 people, people standing and outdoors

येथील समता मैदानावर (पोस्टल ग्राउंड) आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते.

May be an image of 7 people and people standing

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकासाची कामे केली जात आहेत. मागील दोन वर्षात कोरोना संकटाचे रूपांतर संधीत करून आरोग्य यंत्रणा अधिक बळकट केली आहे. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयासाठी एकशे वीस कोटी रूपये मंजूर केले असून त्यातुन जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणखी अद्यावत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे मयत व्यक्तींच्या कुटुंबातील 600 वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. यात आपला जिल्हा महाराष्ट्रात पहिला आहे. आईवडील दोन्ही गमावलेल्या 12 पैकी 10 मुलांना प्रत्येकी पाच लाख रुपये तात्काळ मदत केली आहे. शिवाय पी.एम. केअर फंड मधून 10 लाख रुपयांची मुदत ठेव मिळण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. एक पालक गमावलेल्या 416 मुलांना वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत अकराशे रुपये दरमाह मदत देण्यात येत आहे. गरीब व गरजू नागरिकांना पोट भरण्यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे साडे-अकरा लाख शिवभोजन थाळी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘अन्न सुरक्षा’ योजनेअंतर्गत मोफत गहु व तांदुळ वाटप केले आहे. विविध शासकीय योजनेतून अन्नधान्य वाटपात यवतमाळ जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

May be an image of 7 people and people standing

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात 72 हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्ते योजना जिल्ह्यातून तीन हजार पाचशे कामे प्रस्तावीत केले असून यातून सुमारे सात हजार किलोमीटर पांदण रस्त्यांची कामे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

May be an image of 8 people and people standing

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

May be an image of 8 people and people standing

कार्यक्रमात सुरवातीला पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री भुमरे यांच्या हस्ते वीर नारी व वीर माता-पित्यांचा सत्कार करण्यात आली. तसेच यवतमाळ पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत बदकी यांना गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने त्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

May be an image of 8 people and people standing

कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रमोद दुबे, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंह भोंड, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, संगीता राठोड, डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, तहसिलदार कुणाल झाल्टे, मुख्याधिकारी माधुरी मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण तसेच विविध विभागाचे पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार व गणमान्य नागरिक उपस्थित होते.