राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

गेल्या 24 तासांत देशात 2,68,833 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आतापर्यंत एकूण 6041 ओमायक्राॅन रुग्ण आढळले

मुंबई : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत ‘पॉझिटिव्ह’ घट होत आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर मृतांच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे. राज्यात शुक्रवारच्या तुलनेत आज 749 रुग्ण कमी आढळले आहेत. तर ओमायक्रॉनचे रुग्णही घटले आहेत. 

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 42 हजार 462 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 125 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा 43 हजार 211 इतका होता. तर ओमायक्रॉनचे 238 रुग्ण होते. तर 19 जणांचा मृत्यू झाला होता. 

लसीच्या 156 कोटी 2 लाखांहून अधिक मात्रा 

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 58 लाखांहून अधिक  (58,02,976) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 156 कोटी 02 लाखांचा (1,56,02,51,117)टप्पा ओलांडला आहे.देशभरात 1,67,37,458 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 1,22,684 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून)आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,49,47,390 झाली आहे.परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 94.83% झाला आहे.गेल्या 24 तासांत, देशात 2,68,833 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 14,17,820 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.85% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 16,13,740 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 70 कोटी 7 लाखांहून अधिक (70,07,12,824) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 12.84% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 16.66%.इतका आहे.