ज्यांनी धोका दिलाय त्यांना धडा शिकवू! : कोल्हापुरात अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!

उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर पलटवार

कोल्हापूर/मुंबई ,१९ फेब्रुवारी /प्रतिनिधी :- ज्यांनी धोका दिलाय त्यांना धडा शिकवू. आपल्याला बहुमत नाही तर संपूर्ण विजय हवाय. ४८ च्या ४८ जागा जिंकायच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महान भारताची रचना करायची आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते.

 २०१९ मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवली, अशी टीका अमित शाह यांनी केली.

उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “मागील ९ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत आहोत. पण १२ लाख कोटींचा घोटाळा करणारी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी आमच्यावर एक पैशाचाही आरोप करू शकले नाहीत. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्याची कुणाचीही हिंमत नाही.”

उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती असताना प्रचारासाठी मोदी यांचे मोठे फोटो लावले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या. निवडणुकीतील विजयानंतर यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि उद्धव ठाकरे शरद पवारांच्या पायात जाऊन पडले, अशी घणाघाती टिका शहा यांनी केली.

अमित शाह पुढे म्हणाले, “भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री आमचाच बनायला हवा होता. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. आम्ही सत्तेसाठी सिद्धांतांचा बळी दिला नाही. उद्धव ठाकरेंमुळे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी शरद पवारांच्या पायात जाऊन बसली होती. पण आता काळ बदलला आहे. खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपाबरोबर आली आहे. 

“मागील लोकसभा निवडणुकीत आपण ४८ पैकी ४२ जागा जिंकलो होतो. आपल्याला बहुमत मिळालं होतं. पण यावर आपली संतुष्टी झाली नाही पाहिजे. यावेळी आपल्याला बहुमत नको आहे. संपूर्ण विजय हवा आहे. ४८ पैकी ४८ जागा भारतीय जनता पक्षाला मिळायला हव्यात,” असा निर्धार शाह यांनी व्यक्त केला.

दूध का दूध आणि पानी का पानी

आज दिवसभरात अमित शहा यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सकाळी पुणे येथील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी, एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, शुक्रवारी ‘दूध का दूध आणि पानी का पानी झाले’ आहे. सत्यमेव जयतेचे सूत्र साकार झाले आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत भारतातील निवडून आलेल्या सरकारांचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तो सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.

अमित शाह यांचा मोगॅम्बो असा उद्धव ठाकरेंकडून उल्लेख

मोगॅम्बो काल म्हणाला की मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये अमित शाह यांना उत्तर दिलं आहे. आता जे काही राज्यात सुरू आहे ती कुठली चाटुगिरी आहे? कोण कोणाचा कुठला भाग चाटतो आहे? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्याला आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

मी हिंदुत्व सोडल्याचं म्हणता मग तुम्ही काय सोडलं होतं?

मी काँग्रेससोबत गेलो तेव्हा मी हिंदुत्व सोडलं म्हणाले. तुम्ही मेहबुबा मुफ्ती सोबत गेलात तेव्हा काय सोडलं होतं? की तेव्हा हिंदुत्वापासून टाइम प्लीज घेतली होतीत? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. प्रमोद महाजन यांना एकदा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की एक दिवस असं होईल की देशातले लोक हिंदू म्हणून मतदान करतील. आज हिंदू जागा झाला आहे. मात्र त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम सुरू आहे. निवडणूक आली की हिजाबचा मुद्दा काढायचा, गोहत्येचा मुद्दा काढायचा असे मुद्दे काढून हिंदूंच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

इन्कम टॅक्स, ईडीसारखे लांडगे विरोधकांवर सोडले जात आहेत

इन्कम टॅक्स, ईडी यांच्यासारखे लांडगे विरोधकांवर सोडायचे आणि त्यानंतर मी एकटा लढतोय सांगायचं याला काय अर्थ आहे? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आज सगळ्या गोष्टी फक्त बुद्धिबळाच्या पटासारख्या झाल्या आहेत. आमच्यातल्या काही लोकांना यांनी पट्टा बांधून सोबत नेलं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

माझ्या पक्षातले लोक मलाच हाकलू पाहात आहेत

माझ्या पक्षातले काही लोक दुसरीकडे गेले. माझेच लोक मला माझ्याच घरातून बाहेर काढू पाहात आहेत. त्यांना आता मालक व्हायचं आहे. आमचा निवडणूक आयोगही असा आहे की चोरांना मालक केलं आहे. आज सगळ्या विरोधी पक्षांनी डोळे उघडले पाहिजेत कारण आज जे आमच्यासोबत झालं ते उद्या तुमच्यासोबत होईल. यांना बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा पाहिजे पण त्यांचा मुलगा नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला धोका दिला त्यांना तळवे चाटणारे चालतात का? असंही उद्धव ठाकरेंनी विचारलं आहे.

हिंदू आक्रोश मोर्चा सारखी तर थट्टा नाही

हिंदू आक्रोश मोर्चा निघाला यासारखी तर थट्टा नाही कारण जगातला सर्वात बलवान व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान आहे तर मग देशातल्या हिंदूला आक्रोश का करावा लागतो आहे? या देशात जो राहतो तो आमचा बांधव आहे. मग हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय कुणीही असो तो आमचा बांधव आहे हेच आमचं हिंदुत्व आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी एक जवान होता त्याला ठार केलं गेलं. त्याचं नाव औरंगजेब होतं. त्याला मी भाऊ म्हटलं त्यावर माझ्यावर टीका करण्यात आली.

मुंबईला दासी करायचा डाव

मुंबईला दासी करण्याचा भाजपाचा डाव आहे. प्रत्येक गोष्टीसाठी भिकाऱ्यासारखं कटोरा घेऊन तुमच्या दारात उभं राहिलं पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईत उत्तर भारतीयांना संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनी ही सगळी टीका केली आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे.