पत्रकारांनी सामाजिक पत्रकारितेचा वसा जोपासावा – डॉ. संभाजी खराट

सांगली,६ जानेवारी /प्रतिनिधी:- चांगला समाज निर्मितीमध्ये पत्रकारांचा वाटा मोठा आहे. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यासाठी पत्रकारांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे. बाळशात्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा आदर्श घेऊन पत्रकारांनी सामाजिक पत्रकारितेचा वसा जोपासावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केले.

ऑल रजिस्ट्रर्ड न्यूज पेपर असोसिएशनच्या वतीने मिरज येथे 6 जानेवारी या पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ. खराट बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रा. सागर बोराडे होते. यावेळी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह पत्रकार, छायाचित्रकार, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रथमत: उपसंचालक डॉ. खराट यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करुन उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपसंचालक डॉ. खराट म्हणाले, बाळाशास्त्रींनी दर्पणमधून सामाजिक प्रश्नांना अधिक न्याय दिला आहे. त्यांचा हा सामाजिक पत्रकरितेचा वसा पुढे नेण्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, उपक्षितांचे प्रश्न पत्रकारांनी आपल्या लेखणीतून मांडणे आवश्यक आहे. दर्पणकारांची जी तत्वे, मूल्ये आहेत ती सर्वांनी अंगिकारली पाहिजेत. आपली पत्रकारिता अधिक प्रगल्भ व समाजाभिमुख कशी होईल, या दृष्टिने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्या पत्रकारितेतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून समाजातील उपेक्षित लोकांना न्याय मिळवून देणे  हीच दर्पणकारांना आदरांजली ठरेल, असा विश्वासही डॉ. खराट यांनी व्यक्त केला.

डॉ. खराट म्हणाले, पत्रकार हा समाजाचा जवळचा मित्र आहे. शासनाच्या योजना, नियम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर करावा. समाजातील चांगल्या घटना, प्रसंग यांना आपल्या पत्रिकारितेमध्ये वाव द्यावा. आजच्या काळात राजकीय पत्रकारितेला महत्व दिले जात असल्याने ती  राजकीय विषयांकडे झुकलेली दिसून येते. सामाजिक प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी पत्रकारितेमध्ये राजकीय व सामाजिक विषयांना समान न्याय देण्याची भूमिका पत्रकारांनी बजावावी, असे डॉ. खराट म्हणाले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक विचार केला जात आहे. पत्रकारांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी माहिती महासंचालनालय त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही डॉ. खराट यांनी यावेळी दिली.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर पोवाडा सादर करणाऱ्या शाहीर बजरंग आंबी, आण्णा भाऊ साठे यांच्यावर पोवाडा सादर करणाऱ्या बाल शाहीर कु.अमोघ आंबी,  कोविड काळात घ्यावयाची काळजी यावर केलेल्या मार्गदर्शनाबाबत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पटवर्धन यांचे आणि पत्रकारांसाठी चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

डॉ. पटवर्धन यांनी कोविड साथ रोग काळात घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आजचा मीडिया पॉवरफुल आहे. यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीतून वास्तवता मांडावी. वस्तूस्थितीचा विपर्यास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी उपस्थितांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व समाजात घडणाऱ्या घटना, सत्य, वास्तव व तथ्थ या प्रत्येक बाबीतील फरक समजावून घेण्याची कुवत ही पत्रकारितेने निर्माण केली असल्याचे म्हणाल्या.

ऑल रजिस्ट्रर्ड न्यूज पेपर असोसिएशन चांगले काम करत असल्याचे गौरवोद्गार डॉ. बोराडे यांनी यावेळी काढले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त साप्ताहिकांचा शासनमान्य यादीत समावेश होण्यासाठी माहिती विभागाने सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी दिपक ढवळे यांनी स्वागत केले. राहूल मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मान्यवरांच्या हस्ते संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.