कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई,२८ डिसेंबर/प्रतिनिधी:- राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

अकोला येथील महामार्ग क्रमांक सहावर एका खासगी कंत्राटदाराकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्या डांबरीकरणाच्या प्लँटमध्ये 21 नोव्हेंबर रोजी स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी लक्षवेधी सूचना सदस्य विनायक मेटे यांनी मांडली. यावर सदस्य गोपीकिशन बाजोरिया, जयंत पाटील यांनीही संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

या मागणीची दखल घेवून कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित कंत्राटदारावर 8 दिवसांत गुन्हा दाखल करू. जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येईल, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. राज्यातील कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.