‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरग्रस्तांसाठी ठरणार वरदान

राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लोकार्पण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची विशेष उपस्थिती

नागपूर, २६  एप्रिल / प्रतिनिधी :-मध्य भारतातील कर्करुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या जामठा परिसरातील धर्मादाय तत्वावरील राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे (एनसीआय) लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्या, दि. 27 एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.

डॅा. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेद्वारा संचालित राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या परिसरातील विशेष सभामंडपात सकाळी 10.30 वाजता या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कर्करोग संस्थेचा एकूण 25 एकरचा परिसर आहे. रुग्णालयात 470 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी रुग्णसेवा सुरू असून अल्पावधीतच दुर्धर आजारावर प्रभावी वैद्यकीय उपचार सुरू आहेत. 18 आगस्ट 2012 रोजी या संस्थेच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. 2017 मध्ये पहिल्या टप्प्याचे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 2018 मध्ये 27 बाल रुग्णांसाठीचा स्वतंत्र असा वॅार्ड सुरू करण्यात आला. 2020 मध्ये विप्रोचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी या संस्थेला भेट देत पाहणी करीत कौतुक केले होते. 2020 मध्ये  ‘आयुष्यमती’ या अनोख्या जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात आले होते. कर्करोगाविषयीची महिलांच्या मनातील भीती नष्ट व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्करोगावर मात केलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

आता या संपूर्ण सोईसुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. फक्त निमंत्रितांना यावेळी प्रवेश असणार आहे.