उपचार सुविधांची सज्जता ठेवावी,लसीकरण मोहिमेला गती द्यावी-लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश

लातूर,२८ डिसेंबर/प्रतिनिधी:-
कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि त्यात घातक ओमीक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक त्या सुविधा उभारण्यात, नव्याने उपाय योजना आखाव्यात आणि लसीकरण मोहिमेला गती द्यावी असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या ओमीक्रॉन विषाणूने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना भारतात आणि महाराष्ट्रातही आता ते रुग्ण सापडत आहेत, शिवाय अलीकडच्या काही दिवसात कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे.महाराष्ट्रात विशेष काळजी घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या कार्यवाहीवर लक्ष ठेवून राहावे असेही त्यांनी सांगितले आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून, जिल्ह्यातील सध्याची कोरोना रुग्णसंख्या, रुग्ण वाढीचा दर, जिल्हा आरोग्य यंत्रणेने उभारलेला सोयीसुविधा आणि लसीकरण मोहीम संदर्भाने आढावा घेतला आहे,कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तपासणी मोहीम गतिमान करावी, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तातडीने तपासणी करावी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षण असलेल्या रुग्णांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, आवश्यकतेनूसार त्यांना विलगीकरणात ठेवण्याबाबत निर्णय घ्यावेत अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिल्या आहेत.
जिल्हयातील लसीकरण मोहिमेला गती दयावी. लस न घेणाऱ्या नागरिकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावे. घरोघरी जाऊन या संदर्भात चौकशी करावी, केंद्र शासनाकडून लसीकरणाबाबत ज्या नवीन सूचना येत आहेत त्या संदर्भानेही तयारी करून ठेवावी अशा सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि ओमीक्रॉन विषाणूचा आपल्या भागातील शिरकाव लक्षात घेता संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर या लाटेचा परिणाम कमी राहावा यासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. या संदर्भाने प्रशसनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच बरोबर जनतेनेही शारीरीक आंतर पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करणे याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यापुढे काही दिवस नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, शक्यतो गर्दीतील संपर्क टाळावा, वृध्द आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुले घरीच राहतील याची दक्षता घ्यावी असे आवाहनही ना.अमित देशमुख यांनी केले आहे.
राज्यात आणि देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस विभाग तसेच जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती यांनी त्यांच्यावर असलेला जबाबदारीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी, उपचाराच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.