शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख निघाला बोगस कोरोना प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा बॉस ; देत होता लसीकरणावर उपदेश

वैजापूर,१७ डिसेंबर /प्रतिनिधी :- कोरोना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले नसतानाही बोगस कोरोना प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन डाॅक्टरांसह अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील डाॅ. मोहियोद्दीन शेख उर्फ अदनान शेख फहीम हा तालुक्यातील शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे तालुका आरोग्य अधिकारी पदाचाही पदभार होता. एवढेच नव्हे तर कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्याची एक चित्रफितही समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. चित्रफितीच्या माध्यमातून उपदेशाचे डोस पाजणारा डाॅ. शेख या टोळीचा म्होरक्या निघाला. हे विशेष. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
    कोरोना लसीकरणाचे डोस न घेताच त्यांना बोगस लसीकरणाचे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा औरंगाबाद येथील जिन्सी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीमध्ये  तालुक्यातील शिऊर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहियोद्दीन शेख याच्यासह  पर्यवेक्षिका उषा आढाव व मनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली  शहनाज शेख तिघांचा प्रमुख समावेश आहे. औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यातून हा गोरखधंदा सुरू होता. औरंगाबाद येथील  डाॅ. रझिउद्दीन फहीमउद्दीन शेख हा बोगस लसीकरण करणाऱ्या नागरिकांची नावे, आधारकार्ड व अन्य कागदपत्रे वैद्यकीय अधिकारी  डाॅ. मोहीउद्दिन शेख याच्याकडे पाठवित होता. तो ही कागदपत्रे आरोग्य केंद्रातील उषा आढाव व शहनाज शेख या दोघींकडे पाठवून हा गोरखधंदा सुरू होता. दरम्यान डाॅ. मोहीयोद्दीन शेख याच्याकडे दरम्यानच्या काळात मनूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार होता. याशिवाय तालुका आरोग्य अधिकारी डॉ.  गुरुनाथ इंदूरकर सुटीवर गेल्यानंतर डाॅ. शेख याच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. एवढेच नव्हे तर त्याची एक चित्रफितही समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. ही चित्रफित दस्तूरखुद्द वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केली होती. या चित्रफितीच्या माध्यमातून त्याने कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. लसीकरणाचे महत्त्व यातून त्याने पटवून दिले होते. कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांना उपदेशाचे डोस पाजणारा वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मात्र बोगस लसीकरण प्रमाणपत्राची खिरापत वाटणारा निघाल्याने आरोग्य विभागावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जे शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनीच बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान लसीकरणाचे  बोगस प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफाश झाला अन् त्याचे मूळ वैजापूर तालुक्यात सापडले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा गोरखधंदा तालुक्यातील अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रातही सुरू आहे का?  याचीही  शहानिशा करणे गरजेचे आहे. 

लसीकरण प्रमाणपत्रावर अजूनही मृत कर्मचाऱ्याचे नाव

दरम्यान बोगस लसीकरण प्रमाणपत्र तालुक्यातून दिले जात होते. हे आता तर उघड झाले आहे. परंतु दुसरीकडे लसीकरण प्रमाणपत्रावर अजूनही शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका वैशाली टाक यांचे नाव येते. वास्तविक पाहता टाक यांचे 29 नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर असतांना ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचा मृत्यू होऊनही तब्बल 20 दिवसांचा कालावधी उलटला. परंतु लसीकरण करणाऱ्या म्हणून अजूनही टाक यांचे नाव प्रमाणपत्रावर लिहून येते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा बदल करणे आवश्यक आहे. अन्यथा बोगस प्रमाणपत्र काढणा-यासाठी आणखी खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.