अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्ग उपचारासाठी प्लाझमा थेरेपी यंत्रणा सज्ज!

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या आणखी एका मागणीला यश

बीड/अंबेजोगाई (दि. ०२) – : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजनाबाबत केलेल्या आणखी एका अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीला यश आले असून, आता कोरोना संसर्गावरील उपाययोजनेतील प्लाझ्मा थेरपी यंत्रणा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात सुसज्ज झाली आहे.

लवकरच प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करून कोरोना संसर्गावरील उपचारांना सुरुवात करण्यात येणार आहे, मुंडे यांनी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होता.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी कार्यान्वित करण्यासाठीची पूर्ण क्षमता असून राज्य शासनाने यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. पालकमंत्री मुंडे यांच्या मदतीने स्वाराती रुग्णालयाचे रूप पालटत असून, कोरोनासह विविध गंभीर आजारांवर योग्य निदान व उपचार करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री तसेच अवश्यक निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला जात आहे.महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक आणि संशोधनाचे संबंधित विद्यार्थी ही प्लाझ्मा थेरपी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतील आणि पर्यायाने कोरोनाशी लढणाऱ्या गंभीर व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना यांचा लाभ मिळेल अशी माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोना बाधित झालेल्या परंतु उपचारांनी बऱ्या झालेल्या सक्षम व्यक्तींचा या यंत्रणेत सहभाग घेतला जाईल, २८ दिवसांपूर्वी बऱ्या झालेल्या व्यक्तींची तपासणी करून रक्तदानाद्वारे उपलब्ध झालेल्या प्लाझ्माची एक वर्षापर्यंत साठवणूक करून समान रक्तगटाच्या रुग्णास उपचारासाठी उपलब्ध केले जाईल, यासाठीचे नियोजन व पूर्वतयारी देखील पूर्ण झाल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.

धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने स्वारातीमधील आरोग्य यंत्रणेला बळ

दरम्यान गेल्या दोन अधिक महिन्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य यंत्रणेला बळ मिळत असून आधुनिक यंत्रसामग्री व उपचार पद्धती विकसित केल्या जात आहेत. अनेक वर्षांपासूनची ३.० टेस्ला क्षमतेची एमआरआय मशीनची मागणी पूर्ण करतच मुंडेंनी स्वारातीला ७ नवे व्हेंटिलेटर्स मिळवून दिले आहेत. कोविड कक्ष स्थापनेपासून ते पीपीई किट खरेदीपर्यंत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला ‘मागाल ते पुरवू’ या उक्तीप्रमाणे भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.अत्याधुनिक प्लाझ्मा थेरपीच्या यंत्रणेमुळे आता कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *