‘अभिजात मराठी दालना’तून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार;‘अभिजात मराठी दालना’तून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

नाशिक,२ डिसेंबर /प्रतिनिधी:-  नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार आहे. तसेच साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी दालना’च्या माध्यमातून मराठी भाषेची माहिती व इतिहासाची माहिती रसिकांना दिली जाईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी दालना’ ची व संमेलन स्थळाची मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह पाहणी केली. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते.

मराठी भाषा मंत्री पुढे म्हणाले की, मराठी भाषा विभागाच्यावनीने ‘अभिजात मराठी दालन’ उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे. याची माहिती या दालनातून दिली जाणार आहे. साहित्य संमेलनात उपस्थितांनी या दालनास भेट देऊन मराठी भाषेच्या न्याय्य हक्कासाठी उभे रहावे, असे आवाहन यावेळी श्री. देसाई यांनी केले.

मराठी भाषेचा दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास मांडला जाणार

अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये प्रामुख्याने मराठीच्या इतिहासाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा घेतला जाणार आहे. अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, 19 व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी, मराठी साहित्य परंपरेचे दालन अशा दोन हजारी वर्षापूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासा दरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे आणि संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ. निवडक गाथा आदीच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या दालनात असणार आहे.

मराठीतील प्राचिन व दुर्मिळ ग्रंथ, साहित्य आदी सामुग्री टचस्क्रिन” वर मराठी प्रेमींना पाहावयास मिळणार आहे. याशिवाय शासनानक प्रकाशित केलेल्या विविध पुस्तकांच्या पेनड्राईव्ह मधील विश्वकोष विक्रीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

संमेलनाच्या निमित्ताने लघुपटाची निर्मिती

संमेलनाच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेने ‘शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये एक अभिरुप न्यायालय अशी संकल्पना करण्यात आली असून यात वादविवाद आणि संवादांच्या माध्यमातून जनतेपर्यंत मराठी भाषा विभागाचे म्हणणे मांडण्यात येणार आहे. या लघुपटाची पटकथा प्रा. हरि नरके यांनी लिहिली आहे. अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या लघुपटाची निर्मिती श्रीरंग गोडबोले यांनी केली आहे, अशी माहितीही यावेळी मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांनी दिली आहे.