तोक्ते वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान

रायगड जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान

आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार

रत्नागिरी  जिल्ह्यात 1028 घरांचे नुकसान

देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता

तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि १७: तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Image

या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीजपुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली

Image

कालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालागत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाऊस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर मुंबईत दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली

२ हजार ५४२ बांधकामांची पडझड

या चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. ठाणे २, रायगड ३, सिंधुदुर्ग १ असे ६ जण मरण पावले आहेत. मुंबईत ४, रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली. आज (सायंकाळी 5 वाजेच्या स्थितीनुसार ) हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात १८० किमी दूर असून दिवसभर असणारा वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी होऊन ७० ते ८० किमी प्रती तास इतका होईल पुढे तो आणखी ओसरेल असे त्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ आज रात्री ८ ते ११ पर्यंत गुजरातला धडकेल. त्यावेळी तेथील वाऱ्याचा वेग हा पावणे दोनशे किमी प्रती तास इतका असू शकतो. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागेल असेही त्यांनी सांगितले. गेल्या ६ तासांत मुंबई उपनगरात १२० मिमी पेक्षा जास्त तर कुलाबा भागात १०० ते १२० मिमी पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Image

मुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती बृहन्मुंबई पालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली, तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.

रायगड जिल्ह्यात सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस

अलिबाग:- तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे.

Image

या दरम्यान जिल्ह्यातील आज सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 5 हजार 244 घरांचे अंशत: नुकसान तर 9 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, 6 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. महावितरणच्या एकूण 135 HT पोलचे, 418 LT पोलचे तर 8 ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात एकूण 99 कोविड रुग्णालये कार्यरत आहेत. त्यापैकी रायगड ग्रामीण क्षेत्रातील एकूण 54 कोविड रुग्णालयापैकी 22 रुग्णालये थेट वीजपुरवठयाद्वारे सुरु असून 32 कोविड रुग्णालये जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू आहेत.

त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 45 कोविड रुग्णालयापैकी 44 रुग्णालये थेट विद्युत पुरवठ्यावर सुरू असून 1 रुग्णालय जनरेटर बॅकअप वर सुरळीत सुरू असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मंगळवार दिनांक 18 मे 2021 रोजी ताशी 65 – 75 ते 85 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनीही समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिनांक 16 मे 2021 रोजी सकाळी 8 वा. पासून ते  17 मे 2021 रोजी सकाळी 8 पर्यंत 218 पुर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच 16 तारखेला जिल्ह्यात ताशी 80 ते 90 कि.मी. वेगाने वारे वाहत होते. अतिवृष्टी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, विद्युत तारा व विद्युत पोल पडणे अशा घटना घडलेल्या आहेत. मात्र सदर स्थिती पुर्ववत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.

दि. 16 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडून रस्ता बंद झाला होता. सदर झाडे उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून बाजूला काढू रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात वादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणमार्फत काल रात्रीच सुरू करण्यात आला आहे.

महावितरणच्या एकूण 447 उच्चदाब वाहिन्या वादळामुळे पडलेल्या होत्या. तसेच 812 लघु दाब वाहिन्यांचा परवठा वादळामुळे बंद पडलेला होता. कोविड रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या 6 डीसीएच पैकी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मिळूण एकूण 5 डीसीएचचा, वादळामुळे बंद पडलेला, विद्युत पुरवठा महावितरण मार्फत सुरू करण्यात आलेला आहे. तसेच कोविड रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या 8 डीसीएचसी पैकी 2 डीसीएचसी चा वादळामुळे बंद झालेला विद्युत पुरवठा महावितरण मार्फत सुरू करण्यात आला आहे. ज्या कोविड रुग्णालयांचा वीज पुरवठा अजून सुरू झालेला नाही त्यांचा विद्युत पुरवठा प्राधान्याने सुरू  करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी महावितरणला दिल्या आहेत. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे एकूण 31 विद्युत उपकेंद्रांचा विद्युत पुरवठा बंद होता. त्यापैकी 19 उपकेंद्र दुरुस्त करून विद्युत पुरवठा आज 5.00 वाजेपर्यंत सुरू करण्यात आला आहे. इतर ठिकाणी खंडित झालेला वीज पुरवठाही अतिरिक्त मनुष्यबळ वापरून लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न महावितरण कडून करण्यात येत आहेत.

चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून रस्ते बंद झाले होते. त्यामध्ये सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागातील 13 रस्त्यांवर झाडे पडून रस्ते बंद झाले होते. हे सर्व रस्ते झाडे बाजूला करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तसेच कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील 15 रस्त्यांवरही झाडे पडली होती. हे रस्तेही वाहतुकीसाठी पुर्ववत झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णांकरिता आवश्यक असलेला ऑक्सिजनच्या वाहतुकीत कोणताही खंड न पडता चक्रीवादळाच्या काळातही व्यवस्थित सुरू राहीला. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील 40 रस्त्यांवर झाडे पडली होती. हे रस्तेही आता वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील 84 रस्ते झाडे पडल्यामुळे वाहतुकीस बंद झाले होते. त्यापैकी 69 रस्त्यांवरील वाहतुक सुरू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

रत्नागिरी  जिल्ह्यात 1028 घरांचे नुकसान

Image

रत्नागिरी : तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 132.11  मिमी तर एकूण 1189  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.   मंडणगड 52 मिमी , दापोली 82 मिमी, खेड 49 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी, संगमेश्वर 142 मिमी, रत्नागिरी 274 मिमी, राजापूर 208 मिमी, लांजा  तालुक्यामध्ये 162 पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांचेकडून तोक्ते चक्रीवादळाच्या झालेल्या नुकसानीबाबतची  प्राथमिक माहिती (12 वाजेपर्यंत) पुढीलप्रमाणे आहे.

मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350 घरे, खेड तालुक्यात 30 घरांचे, गुहागर 05 घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यात 1028 घरांचे तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.  या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1,  संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या असून गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वर मध्ये 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत.  जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्यांचे 09 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

वादळामुळे राजापूर तालुक्यात 652 व्यक्ती, रत्नागिरी तालुका 363, दापोली तालुका 2373, मंडणगड तालुका 508, गुहागर तालुका 667 असे एकूण 4563 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले.  सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

सदरचा अंदाज हा प्राथमिक स्वरुपाचा असून 17 मे 2021 रोजी पासून संबंधित तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

चक्री वादळ, वीज पुरवठा गोषवारा

रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळ परिस्थिती मुळे वीज प्रणाली बाधित झाली त्याचा दिनाक 17 मे दुपारी 3 वाजता गोषवारा.

1 एकूण गावे 1239 पैकी 760 बंद 479 सुरू

2 एकूण उपकेंद्रे 55 पैकी 27 सुरू 28  बंद

  1. ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 1883 सुरू 5665 सुरू होणे बाकी
  1. एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 187711 सुरू 357409 सुरू होणे बाकी
  1. HT पोल 164 बाधित
  1. LT पोल 391 बाधित
  1. HT लाईन नादुरुस्त 49 किलोमीटर
  1. LT लाईन नादुरुस्त 117 किलोमीटर
  1. ट्रान्सफॉर्मर 15 नादुरुस्त.
  1. मनुष्यबळ, कंपनी चे 71 माणसे 910, कंत्राटी 33 टीम माणसे 30

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये – महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये – महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन

ठाणे : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एमएमआर क्षेत्रात दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून ठाणे शहरातदेखील त्याचा प्रभाव जाणवत असल्याने या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तोक्ते चक्रीवादळामुळे दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता शासनाच्या हवामान विभागाने वर्तवली असून ठाणे शहरात देखील कालपासून या वादळाचा प्रभाव जाणवत आहे. कालरात्री पासून शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या चक्रीवादळामुळे वाहणारा सोसाट्याचा वारा आणि अतिपर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. यामध्ये  झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

दरम्यान महापालिकेची सर्व यंत्रणांना सतर्क व सुसज्ज असून मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी:– तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर 53 ठिकाणते अंशतः नुकसान झाले आहे. तर 782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पोल पुर्णतः पडले आहेत. तर 305 विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून 1 विद्युत वाहिनीचे पूर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.

एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे 16 लक्ष 94 हजार 100 रुपये, 19 शाळांचे 8 लक्ष 75 हजार 707 रुपयांचे, 11 शासकीय इमारतींचे 1 लक्ष 70 हजार रुपयांचे, 13 शेडचे 1 लक्ष 10 हजार रुपयांचे 4 सभागृहांचे 6 लक्ष 16 हजार रुपयांचे आणि इतर 6 लक्ष 38 हजार 300 असे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची विभाग निहाय व तालुका निहाय माहिती पुढील प्रमाणे असून सर्व नुकसानीची माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे.

*       दोडामार्ग – 44 घरांचे नुकसान झाले असून त्यामध्ये 43 घरांचे अंशतः व  एका घराचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 2 शांळांचेही नुकसान झाले असून 43 ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत. 43 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

*       सावंतवाडी – 116 घरांचे अंशतः तर 4 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 13 गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले आहे. 350 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून 100 विद्युत पोलही पडले आहेत. एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे.

*       वेंगुर्ला – 87 घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद असून 6 गोठ्यांचे, एका शाळेचे, 3 शासकीय इमारतींचे, 45 विद्युत पोल आणि 2 विद्युत वाहिन्यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

*       कुडाळ – 302 घरांचे, 22 गोठ्यांचे, 7 शाळांचे, 2 शेडचे व 2 सभागृहांचे अंशतः नुकसान झाले असून 120 विद्युत पोलचे अंशतः नुकसान झाले आहे.

*       मालवण – 972 घरांचे अंशतः तर 7 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. 25 गोठ्यांचे, 2 शाळांचे, 8 शासकीय इमारती, 157 विद्युत पोल, 10 शेडचे व एका सभागृहाचे अंशतः नुकसान झाले आहे. 412 ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

*       कणकवली – 133 घरांचे, 29 गोठ्यांचे, एका शाळेचे, 66 विद्युत पोल, 16 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

*       देवगड – 145 घरांचे, 36 गोठ्यांचे, 4 शाळांचे, 132 विद्युत पोल, 95 विद्युत वाहिन्या यांचे अंशतः नुकसान झाले आहे.

*       वैभववाडी – 262 घरांचे, 8 गोठ्यांचे, एका शाळेचे, 120 विद्युत पोल, 35 विद्युत वाहिन्या आणि एका शेडचे अंशतः नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात एकूण 907 ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तोक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटता महावितरणला

तोक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी 12 ते 13 सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर उर्वरित सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.

देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता

सिंधुदुर्गनगरी: – ताउत्के चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी रा. पावस, रत्नागिरी, नंदकुमार नार्वेकर रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर, रा.रत्नागिरी, विलास सुरेश राघव, रा. पुरळ – कळंबई, ता. देवगड, सूर्यकांत सायाजी सावंत, रा. हुंबरठ, ता. कणकवली हे सुखरूप बाहेर आले आहेत.

याविषयी देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार काल दुपारी 3.30 वा. सुमारास आंनदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी, निरज यशवंत कोयंडे यांची, आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या. त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण 7 खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.

तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांनी बचावलेल्या खलांशांची भेट घेतली. सदरचे खलाशी हे मौजे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याचे कळाले.

मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्र्यांकडून सकाळपासून वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष

मुंबई, दि. १७ :- राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.