देशात लसीच्या मात्रांची कमतरता नसल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या प्रथमच अंशतः लसीकरण झालेल्या पात्र लोकसंख्येपेक्षा जास्त: डॉ. मनसुख मांडवीय

नवी दिल्ली ,१७ नोव्हेंबर/प्रतिनिधी:-

“देशात पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या प्रथमच अंशतः लसीकरण झालेल्या पात्र लोकसंख्येपेक्षा जास्त झाली आहे. माननीय पंतप्रधानांची ‘जन-भागीदारी’ ची दृष्टी आणि ‘संपूर्ण सरकारी दृष्टीकोन’, लोकांचा सरकारवरील भरवसा आणि विश्वास तसेच सध्या सुरू असलेल्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेला देशाच्या विविध भागातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे हे शक्य झाले आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे केले.

आज सकाळी 7 वाजताच्या तात्पुरत्या अहवालानुसार देशात एकूण 113.68 कोटी (1,13,68,79,685) हून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून गेल्या 24 तासांत 67,82,042 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 1,16,73,459 सत्रांतून हे साध्य झाले आहे. त्यापैकी 75,57,24,081 जणांना लसीची पहिली मात्रा तर 38,11,55,604 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. अशा प्रकारे, पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या (38,11,55,604) ज्यांना एकच मात्रा देण्यात आली आहे (37,45,68,477) त्यांच्यापेक्षा जास्त आहे.

महिनाभर चालणाऱ्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या अखेरीस देशात प्रत्येक भारतीयाचे लसीकरण होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 100 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा बहुमान देशाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी प्राप्त केला. त्यानंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी आवाहन करून प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाला कोविड-19 प्रतिबंधक लस मिळण्यासाठी 3 नोव्हेंबर 2021 रोजी ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू केली असे डॉ. मांडवीय यांनी सांगितले.

देशात लसीच्या मात्रांची कमतरता नसल्याची ग्वाहीही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी लोकांना दुसऱ्या मात्रेसाठी पुढे येण्याचे तसेच त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा घेण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.