51 नायट्रोजन प्रकल्पांचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांमध्ये रूपांतर

वायुरूप ऑक्सिजनच्या वापराचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

नवी सिल्ली  ,२ मे /प्रतिनिधी 

कोविड 19 महामारीच्या परिस्थितीत वैद्यकीय ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मितीसाठी विद्यमान नायट्रोजन प्रकल्पांचे  रूपांतर करण्याच्या व्यवहार्यतेची चाचपणी केली. विद्यमान नायट्रोजन प्रकल्प  ऑक्सिजन उत्पादनासाठी वापरता येतील अशा  अनेक संभाव्य उद्योगांची निवड करण्यात आली आहे.

ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी विद्यमान प्रेशर स्विंग ऍबसॉरप्शन  (पीएसए) नायट्रोजन प्रकल्पांचे रूपांतर करण्याच्या प्रक्रियेवर यावेळी चर्चा झाली. नायट्रोजन प्रकल्पांमध्ये कार्बन मॉलेक्युलर सिव्ह (CMS) वापरले जाते तर ऑक्सिजन तयार करण्यासाठी झीओलाइट मॉलेक्युलर सिव्ह (ZMS) आवश्यक असते. म्हणूनच, सीएमएसच्या ऐवजी झेडएमएस वापरून आणि ऑक्सिजन अ‍ॅनालायझर, कंट्रोल पॅनेल सिस्टम, फ्लो व्हॉल्व्ह इत्यादी सारखे काही बदल करून सध्याच्या नायट्रोजन प्रकल्पांमध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी बदल करता येतील.

उद्योगांबरोबर चर्चा केल्यावर आतापर्यंत 14 उद्योगांची निवड करण्यात आली  आहे, ज्यात प्रकल्पांचे परिवर्तन प्रगतीपथावर आहे. आणखी 37 नायट्रोजन प्रकल्प देखील उद्योग संघटनांच्या मदतीने निवडण्यात आले आहेत.

ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी सुधारित नायट्रोजन प्रकल्प जवळच्या रूग्णालयात हलवता येऊ शकतो किंवा जर प्रकल्प हलवणे व्यवहार्य नसेल तर ते ऑक्सिजनच्या ऑन-साईट उत्पादनासाठी वापरले जाऊ शकतात, जे नंतर  सिलेंडर/ विशिष्ट उपकरणाच्या माध्यमातून रुग्णालयात पाठवले जाऊ शकते.

पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, रस्ते वाहतूक व महामार्ग सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती.

वैद्यकीय उद्दिष्टांसाठी वायुरूप ऑक्सिजनच्या वापराचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

पंतप्रधान मोदी यांनी ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा वाढविण्याच्या नवीन मार्गांचा शोध घेण्याच्या त्यांच्या निर्देशानुसार वायूरूप ऑक्सिजनच्या वापराचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेतली.

स्टील प्रकल्प, पेट्रोकेमिकल युनिटसह रिफायनरीज, ज्वलन प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारे उद्योग, उर्जा संयंत्र इत्यादी अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प आहेत ज्यामध्ये वायूरूप ऑक्सिजन तयार होतो; ज्याचा वापर प्रक्रियेत केला जातो. हा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वापरला जाऊ शकतो.

आवश्यक त्या शुद्धतेचा वायुरूप ऑक्सिजनची निर्मिती करणारे उद्योग शोधून शहरे / दाट वस्तीचे भाग / मागणी केंद्रांच्या जवळ असलेले उद्योग निवडून त्या स्रोताजवळ ऑक्सिजनयुक्त खाटा असलेली तात्पुरती कोविड केअर सेंटर स्थापित करणे अशाप्रकारचे धोरण राबविले जात आहे. अशा 5 सुविधा प्रायोगिक तत्वावर यापूर्वीच सुरू करण्यात आल्या होत्या आणि त्याची चांगली प्रगती आहे. हे प्रकल्प कार्यान्वयन करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम किंवा खासगी उद्योगांद्वारे आणि केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून केले जात आहे.

अशा प्रकल्पांजवळ तात्पुरती रूग्णालये बनवून अल्पावधीतच सुमारे 10,000 ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

महामारीला सामोरे जाण्यासाठी ऑक्सिजनयुक्त खाटांसह अशा आणखी काही सुविधा स्थापित करण्यास राज्य सरकारांना प्रोत्साहित केले जात आहे.

पंतप्रधानांनी पीएसए प्रकल्प सुरू करण्याच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. पीएम केअर, पीएसयू आणि इतरांच्या योगदानाद्वारे सुमारे 1500 पीएसए प्रकल्प सुरू असल्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले. या प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.