महाराष्ट्रातील ११ खेळाडू आणि ३ संस्थांना केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

मराठवाड्याच्या खोखो खेळाडू सारिका काळे आणि कुस्तीपटू राहुल आवारे यांना अर्जुन पुरस्कार प्रदान 

नवी दिल्ली,१ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- क्रीडा मंत्रालयाने आज  दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या सर्व विजेत्यांना पुरस्कार  प्रदान केले. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 च्या सर्व विजेत्यांना या पूर्वीच  रोख पारितोषिके मिळाली होती मात्र कोविड-19 महामारीमुळे  क्रीडा पुरस्कार सोहळा आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आला होता  त्यामुळे  मागील वर्षीच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना चषक आणि प्रशस्तीपत्र प्रत्यक्षरीत्या प्रदान करण्यात आली नव्हती..या कार्यक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांच्यासह क्रीडा सचिव श्रीमती  सुजाता चतुर्वेदी, युवा व्यवहार सचिव श्रीमती उषा शर्मा आणि मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे  अधिकारी  उपस्थित होते.

Image

केंद्रीय क्रीडा मंत्रालयातंर्गत येणारऱ्या स्पोर्ट्स ऑथरिटी ऑफ इंडियाच्यावतीने अशोका हॉटेल येथे एका शानदार कार्यक्रमात प्रत्यक्षपणे राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले. मागच्यावर्षी 29 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रपतींच्‍या हस्ते पुरस्कार आभासी पद्धतीने प्रदान करण्यात आले होते. आज प्रत्यक्षपणे केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा  मंत्री श्री.ठाकुर यांच्याहस्ते खेळाडुंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी एकूण 54 खेळाडूंना आणि 6 संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 11 खेळाडू आणि 3 संस्थांचा समावेश आहे.

29 ऑगस्ट 2020 रोजी, क्रीडा मंत्रालयाने 5 राजीव गांधी खेलरत्न आणि 27 अर्जुन पुरस्कारांसह एकूण 74 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले.

सोमवारी आयोजित  समारंभात राणी रामपाल, विनेश फोगट आणि  मरियप्पन थंगवेलू हे  प्रतिष्ठेचा  खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि लव्हलिना बोर्गोहेन, इशांत शर्मा, अतनु दास, सात्विक साईराज रंकीं  रेड्डी, चिराग चंद्रशेखर शेट्टी,या अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंसह अनेक पुरस्कार विजेते उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्यांना संबोधित करताना श्री अनुराग ठाकूर म्हणाले, “सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन आणि त्यांना  भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.पुरस्कार विजेत्यांचा प्रवास इथेच संपलेला नाही, त्यांना अजून खूप काही साध्य करायचे आहे.आपण प्रतिभावान खेळाडूंचा शोध सुरू ठेवला पाहिजे, त्यांना तयार केले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्यासाठी  सक्षम केले पाहिजे. त्यामुळे, मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की, भविष्यात भारतासाठी पदके जिंकू शकतील अशा किमान पाच खेळाडूंना तयार करण्याचा  आणि त्यांना प्रशिक्षित करण्याचा  देण्याचा वसा घ्यावा.”

महाराष्ट्रातील 11 खेळाडू आणि 3 संस्था सन्मानित

पॉवरलिफ्टिर विजय मुनश्विर यांना त्यांच्या संपुर्ण कारर्कीदीसाठी ‘द्रोणाचार्य’श्रेणीतील जीवनगौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील 6 खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान

वर्ष 2020 मध्ये महाराष्ट्रातील 6 खेळाडुंना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला होता आणि आभासी माध्यमाने प्रदानही करण्यात आला होता. आज प्रत्यक्षपणे या खेळाडुंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. यामध्ये रोवींग या क्रीडा प्रकारासाठी दत्तु बबन भोकनल, कुस्तीगीर  राहुल आवारे यांना कुस्तीसाठी, जलतरणपटू सुयश नारायण जाधव यांना जलतरणसाठी, चिराग शेट्टी यांना बॅडमिंटन या क्रीडा प्रकारासाठी, सारीका सुधाकर काले यांना खो-खो खेळासाठी मधुरीका सुहास पाटकर यांना टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बँडमिंटन या क्रीडा प्रकारासाठी प्रदीप गंधे आणि टेबल टेनिस कोच म्हणून नंदन पी बाळ यांना   ध्यानचंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 2019 च्या तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी केवल कक्का यांना सन्मानित करण्यात आले.

क्रीडा क्षेत्रातील पायाभुत सोयी-सुविधा उपलब्ध करून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील 3 संस्थांची निवड करण्यात आली होती. यामध्ये आर्मी स्पोर्टस इंस्टीट्यूट, पुणे, लक्ष्य इन्स्टीट्यूट, पुणे, आंतरराष्ट्रीय इन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्टस मॅनेजमेंट, मुंबई यांचा समावेश आहे. आज या संस्थांना प्रत्यक्ष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.