भारत इतिहास घडवितो: ‘100 कोटी’ लसीकरण मात्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला

100 कोटी लसीकरण मात्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल डॉक्टर आणि परिचारिकांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.15%आहे; मार्च 2020 नंतरचा हा सर्वाधिक दर

गेल्या 24 तासांत 18,454 नवीन रुग्णांची नोंद झाली

भारताचा सक्रिय रुग्णभार सध्या 1,78,831 इतका आहे

नवी दिल्ली, २१ऑक्टोबर /प्रतिनिधी :-

देशाने ऐतिहासिक कामगिरी बजावत  आज  कोविड -19 लसींच्या  100 कोटी  मात्रा देण्याचा महत्त्वपूर्ण  टप्पा ओलांडला आहे.  आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आणि हा  विस्मयकारक पराक्रम गाजविल्याबद्दल  देशातील वैज्ञानिक समुदाय आणि आरोग्य व्यावसायिकांप्रती  कृतज्ञता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी 100 कोटी  लसीकरण मात्रांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि ज्यांनी लसीकरणाचे कार्य केले त्या सर्वांप्रती  कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

 आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

 “भारत इतिहास घडवितो.

 आम्ही 130 कोटी भारतीयांच्या  विज्ञान, उद्योजकता,आणि सामूहिक भावना यांच्या सफलतेच्या विजयाचे साक्षीदार आहोत.

100 कोटी लसीकरण मात्रांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन.  ही कामगिरी साध्य करण्यासाठी,  आमचे  डॉक्टर, परिचारिका आणि ज्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले, त्या सर्वांचे मी  आभार मानतो.

गेल्या 24 तासांमध्ये 17,561 रूग्ण कोविडमुक्त झाल्याने, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या प्रारंभापासून)ही 3,34,95,808  इतकी झाली आहे.

परिणामी, भारतात रूग्ण बरे होण्याचा  दर सध्या 98.15% आहे.  हा दर सध्या मार्च 2020 नंतरच्या उच्चांकी स्तरावर आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून सातत्यपूर्ण आणि सहयोगी प्रयत्नांमुळे सलग 116 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन प्रकरणांचा नोंदवल्या जाणाचा  कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 18,454 नवीन रूग्णांची नोंद झाली .सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 2 लाखांच्या खाली आहे आणि ती 1,78,831 आहे.  सक्रीय रुग्ण दर सध्या देशातील एकूण  रुग्णांच्या 0.52% आहे, जो मार्च 2020 नंतर सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्यांच्या  क्षमतेत सतत वाढ होत आहे.  गेल्या २४ तासांत एकूण 12,47,506 चाचण्या केल्या गेल्या.  भारताने आतापर्यंत एकूण 59.57 कोटी (59,57,42,218) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढत  असताना, साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी दर 1.34% वर असून गेल्या 118 दिवसांपासून 3% पेक्षा कमी राहिला आहे.  दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर 1.48%  इतका नोंदवला  गेला आहे.  दैनंदिन पाॅझिटिव्हिटी दर गेल्या 52 दिवसांपासून 3% च्या खाली आणि आता सलग 135 दिवस 5% च्या खाली राहिला आहे.

हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 100 कोटी लोकांना कोविड -19 प्रतिबंधक लस दिल्याबद्दल देशाचे अभिनंदन केले आहे. हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण असल्याचे ते म्हणाले.

अमित शहा यांनी ट्विटच्या संदेशात म्हटले आहे की “ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण ! आज, भारताने नरेंद्र मोदीं यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि सातत्यपूर्ण  प्रोत्साहनाद्वारे कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचे 100 कोटींहून अधिक मात्रांचे लक्ष्य साध्य करून एक विक्रम प्रस्थापित करून  संपूर्ण जगाला नवीन भारताच्या अफाट क्षमतांची पुन्हा एकदा ओळख करून दिली आहे.

केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्र्यांनी  हा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात  देशातील सर्व वैज्ञानिक , संशोधक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशाचे अभिनंदन करतो आणि सर्व वैज्ञानिक, संशोधक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो , ज्यांनी अनेक आव्हानांवर मात करून या महान कार्यात योगदान दिले आणि प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा आणि आरोग्याप्रति वचनबद्धतेबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो”.