अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट; कृषि क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर देणार

मुंबई,६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- अर्जेंटिनाचे राजदूत ह्युगो झेवियर गोब्बी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

यावेळी अर्जेंटिना व महाराष्ट्रातील कृषि क्षेत्रातील पिके, हवामान, पाऊस, आर्द्रता, सेंद्रिय शेती, वाहतूक व्यवस्था, फलोत्पादन या बाबींवर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी आपापल्या भागातील माहितीची देवाणघेवाण केली. राज्यात तसेच अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचे पीक घेण्यात येते. या पिकासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

साठवण क्षमतेवर चर्चा

अर्जेंटिना देशात कमी खर्चात शास्त्रीयदृष्ट्या चांगल्या प्रकारे कृषी मालाची साठवणूक करण्याबाबत तंत्रज्ञान आहे. त्यासंदर्भात अर्जेंटिनाकडून सहकार्याची अपेक्षा कृषि मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातून होत असलेले कांदा, केळी, द्राक्षे, डाळींचे मोठ्या प्रमाणातील उत्पादन व निर्यात याची माहिती कृषि मंत्र्यांनी अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाला दिली. हवामान बदलासंदर्भात आणखी संशोधन होण्याची गरज दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली.

मालीच्या वाणिज्यदूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट; कृषि माल प्रक्रिया, शीतगृह उभारणी आणि निर्यातीवर चर्चा

मालीच्या वाणिज्यदूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट; कृषि माल प्रक्रिया, शीतगृह उभारणी आणि निर्यातीवर चर्चा

मालीचे वाणिज्यदूत विकास मित्तरसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सहसचिव सुशील खोडवेकर उपस्थित होते.

निर्यातक्षम मालाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा

राज्यात निर्यातक्षम कृषिमालाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विभागाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार असल्याचे सांगून कृषिमंत्री श्री.भुसे यांनी आगामी काळात कृषिमाल उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांची एक परिषद आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही दिली.

दर्जेदार हळद उत्पादनावर भर

राज्यात दर्जेदार हळदीचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिली.

कृषि माल प्रक्रिया, शीतगृह उभारणी आणि कृषि मालाची निर्यात या बाबींवर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी आपापल्या भागातील माहितीची देवाणघेवाण केली.