ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेंटिलेटर्स तयार ठेवण्याचे केंद्राकडून राज्यांना नवे निर्देश

परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटी-पीसीआर चाचणी

नवी दिल्ली : चीनमध्ये एकाच दिवसात तब्बल ३.७ कोटी कोरोनाचे केसेस आढळून आल्याने आता इतर देशांचे धाब दणाणले आहे. भारतानेही हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आला असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना नव्याने तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ताजी सहा मुद्द्यांची कोविड अॅडव्हायजरी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर्स आणि व्हेंटिलेटर्स तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतील तरी त्याचे प्रमाण खूप कमी आहे. पण भविष्यातील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने सर्व राज्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. नव्याने काढलेल्या अॅडव्हायजरीत वैद्यकीय पायाभूत सुविधांची देखभाल आणि त्या पुन्हा अॅक्टिव्ह करण्याबाबतचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.

केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुमच्याकडील मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करणारे पीएसए प्लॅंट्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे तसेच त्याची नियमित तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता तसेच ते पुन्हा विनाव्यत्यय रिफील करण्याची व्यवस्थाही तयार असल्याची खात्री करुन घ्यावी, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारचा मोठा निर्णय

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. अशामध्ये आता भारत केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केला आहेत. त्यांनी जाहीर केले, परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. कोरोनाचा परदेशात वाढत प्रादुर्भाव पाहता हे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत.

आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असणार आहे. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे. देशामध्ये सध्या ३३९७ कोरोना रुग्ण सक्रिय असून सध्यातरी लॉकडाऊनसारखी पाऊले सरकार उचलणार नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. यापूर्वीही केंद्र सरकारकडून घाबरण्याचे काही कारण नसून फक्त खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.