महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेच्या तयारीचा रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई ,१ डिसेंबर  / प्रतिनिधी :-केंद्रीय रेल्वे, कोळसा, खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बुधवारी चर्चगेट येथील जनशिकायत कार्यालयात घेतली.

रावसाहेब दानवे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य आणि देशभरातून अनेक भाविक मुंबईत येत असतात. त्यांना रेल्वे स्थानकात अधिकाधिक सोयी उपलब्ध करून, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपापल्या विभागांतील घेण्यात आलेल्या पूर्वतयारीचे रेल्वे राज्यमंत्र्यांना सादरीकरण केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांनी स्पष्ट केले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांना पूर्व नियोजित ब्लॉकचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच नियमित सेवा सुरूच राहतील.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे १४ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच आदिलाबाद – मुंबई ट्रेनला १ अतिरिक्त कोचही जोडण्यात येणार आहे. त्याबाबत प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सविस्तर माहिती दिली. त्याशिवाय मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर व हार्बर मार्गावर १२ उपनगरी विशेष गाड्या चालविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याची माहिती मध्य रेल्वे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी दिली.

मुंबईतील दादर तसेच अन्य स्थानकांवर एकाच वेळी होणाऱ्या गर्दीतील प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची विशेष ड्युटी देण्यात येईल अशी माहिती प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनिजीत सिंह यांनी दिली.