सुदृढ, निरोगी आणि बुद्धिमान व्यक्तीचा पाया बालवयातच घडविला जातो: डॉ.अशोक बेलखोडे

अहमदनगर ,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, अहमदनगर, पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण मासानिमित्त या  विशेष वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते.

‘राष्ट्रीय पोषण मास :बालकांचा आहार व कुपोषणाची कारणे’ या विषयावरील मार्गदर्शनपर वेबीनारमध्ये राज्यस्तरीय (कुपोषण) गाभा समितीचे  सदस्य तसेच मराठवाडा वैधानिक विकास मंडळ सदस्य व आरोग्य समिती अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी , महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर मनोज ससे आणि  बाल विकास प्रकल्प अधिकारी, नेवासा, अहमदनगर सोपान ढाकणे,यांचा सहभाग होता.

लहान वयात होणाऱ्या लग्नामुळे कमी वजनाची बालके जन्मास येतात. 18 वयाआधी लग्न होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अजूनही 35 ते 39 टक्के असल्याचे डॉ. बेलखोडे यांनी लक्षात आणून दिले.कुपोषित बालके जन्मास येणे आणि रक्तक्षय असलेल्या माता यामध्ये भारत अग्रस्थानी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले .

भेदभाव न करता मुलामुलींना समान आणि योग्य आहार देणे गरजेचे आहे . भावी माता म्हणून मुलींना लक्षपूर्वक आहार देऊन त्यांचे हिमोग्लोबीन योग्य राहण्यासाठी प्रयत्न  करण्याबरोबरच आई होण्यासाठी सक्षम वय  झाल्यानंतरच लग्न हा  विषय गांभीर्याने घ्यायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.

आदिवासी, ग्रामीण भागात डॉक्टरांनी काही वर्षे सेवा द्यावी. मजूरी करणाऱ्या महिलाना  बाळंतपणात सहा महिन्याची पगारी रजा मिळावी.आईला याविषयी जागरूक करण्यासाठी समाजातील शिक्षित व्यक्ती , आरोग्य कर्मचारी  सामाजिक कार्यकर्ते यांनी जबाबदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. बेलखोडे यांनी याप्रसंगी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात कुपोषण विषयात अजूनही खूप काम करण्याची गरज असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली .

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, अहमदनगरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सोपान ढाकणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नेवासा, अहमदनगर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, महिला बालकल्याण विभाग अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले होते. सुमारे आठ हजार नागरिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.