पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली कोरोना योद्धांबद्दल कृतज्ञता

नवी दिल्ली ,३० मे /प्रतिनिधी:-  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या दुसर्‍या लाटेविरूद्धच्या  लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योध्द्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, देशाच्या दुर्गम भागात द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचविणे खरोखर एक मोठे कार्य  होते. आपल्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, दुसऱ्या लाटेला तोंड देताना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, डॉक्टर, परिचारिका आणि आघाडीवरील योद्ध्यांनी दिवसरात्र कसे कष्ट  केले, हे लोकांनी पाहिले आहे.

ते म्हणाले की,देशाचा संकल्प कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नेहमीच सक्षम होता. श्री. मोदी म्हणाले की,महामारीच्या काळात सेवा आणि सहकार्याच्या संकल्पाने भारत पुढे जात आहे. त्यांनी प्रत्येकाला शारीरीक अंतर पाळण्याचे, मास्क  घालण्याचे आणि  लस घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधान म्हणाले, जेव्हा देशात महामारीची दुसरी लाट  आली तेव्हा ऑक्सिजनची मागणी अचानक वाढली. औद्योगिक ऑक्सिजनची निर्मिती करणारे अनेक प्रकल्प देशाच्या पूर्वेकडील भागात आहेत. क्रायोजेनिक टँकर चालक, ऑक्सिजन एक्सप्रेस आणि वायुदलाच्या वैमानिकांनी शेकडो, हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी युद्धपातळीवर कार्य केले. मोदींनी, उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील दिनेश उपाध्याय यांच्याशी संवाद साधला ,ज्यांनी द्रवरूप ऑक्सिजनचा टँकर चालविण्याचा अनुभव सांगितला. ऑक्सिजनसह रुग्णालयात पोहोचल्यावर टँकरचालक लोकांना देवदूतासमान वाटतो, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यांनी, भारतीय रेल्वेची ऑक्सिजनची वाहतूक सुलभ केल्याबद्दल प्रशंसा केली. नौदल, हवाई दल, सैन्य दल आणि संरक्षण आणि संशोधन संस्था(डीआरओडी) यासारख्या संस्थांकडून पार पाडली जाणारी  महत्त्वपूर्ण भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले, की ऑक्सिजनच्या वाहतुकीत ते कशा प्रकारे सुविधा देतात हे देशवासी समजून घेण्यास उत्सुक आहेत. या विषयावर, त्यांनी हवाई दलातील ग्रुप कॅप्टन पटनायक यांच्याशी संभाषण केले.

पंतप्रधान म्हणाले की, भारत एका दिवसात 900 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन तयार करीत असे. आता त्याचे उत्पादन 10 पटीने वाढून  दररोज सुमारे 9500 मेट्रिक टन इतके उत्पादन करण्यात येत आहे. श्री. मोदी म्हणाले की, महामारीच्या सुरुवातीच्या काळात देशात फक्त एक चाचणी करण्याची  प्रयोगशाळा होती , परंतु आज 2500 हून अधिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

पंतप्रधान म्हणाले की या महामारीच्या काळातही देशातील शेतकर्‍यांनी अन्नधान्यांचे विक्रमी उत्पादन केले आहे.

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यातील,सर्व लोकांच्या धैर्य, संयम आणि  शिस्तप्रियतेचे  त्यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, की ज्या लोकांनी बचाव आणि मदतकार्य केले त्या लोकांचे कौतुक करावे तितके  अधिक आहे, (ते सर्वाधिक प्रशंसेस पात्र आहेत.) नरेंद्र मोदी सरकारला आज 7 वर्षे पूर्ण होत आहेत.