राज्यपालांच्या हस्ते ‘नॅक’च्या महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण अहवालाचे प्रकाशन

मुंबई,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. २१) बंगळूरु येथे राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेने {नॅक} तयार केलेल्या  महाराष्ट्र राज्याच्या अहवालाचे प्रकाशन केले.

‘महाराष्ट्र राज्यातील मूल्यांकन झालेल्या उच्च शिक्षण संस्थांचे राज्यस्तरीय विश्लेषण’ या अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमाला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे संचालक प्रो.एस. सी. शर्मा उपस्थित होते.

नॅकने आतापर्यंत १६ राज्यांचे अहवाल तयार केले असून महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण संस्थांचे विश्लेषण असलेला नॅकचा हा १७ वा अहवाल आहे.  तज्ज्ञ समितीने तयार केलेल्या या अहवालामध्ये महाराष्ट्र राज्याचा परिचय, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाचा आढावा, गुणवत्ता विश्लेषण, संख्यात्मक विश्लेषण, अहवालातील निष्कर्ष व निरीक्षणे तसेच भावी दृष्टिक्षेप व शिफारसींचा समावेश आहे.