धनादेश अनादर प्रकरणी टुर्स – ट्रॅव्हल मालकाला १० लाख नुकसानभरपाईसह सहा महिने सक्तमजुरी

औरंगाबाद ,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

धनादेश अनादरप्ररकणी टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्हल मालकाला सहा महिने सक्तमजुरी आणि नुकसानभरपाई म्हणुन दहा लाख रुपये फिर्यादीला देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले. या बरोबरच एक लाख रुपये दंड म्हणुन महिन्‍याभरात न्‍यायालयात जमा करण्‍याचे आदेशही प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी दिले. गिरीश धरमचंद जैन (चोरडिया) (३८, रा. न्‍यु हिरा इंग्लीश स्‍कुलसमोर, गोविंदनगर, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात निता सचिन चांडक (४९, रा. कुंभारवाडा, औरंगपुरा) यांनी फिर्याद दिली होती.१९९९ पासुन फिर्यादी आणि आरोपी शेजारी रहात होते. २०१४ मध्‍ये आरोपीने औरंगाबादेत टुर्स अॅण्‍ड टॅव्‍हर्ल्स आणि मीन एक्सचेंज व्‍यवसाय भागीदारीमध्‍ये करण्‍यास फिर्यादीला विनंती केली होती. फिर्यादीने आरोपीवर विश्‍वास ठेवून भागीदारीप‍त्र तयार करण्‍यासाठी मृत  पतीच्‍या विमा  पॉलीसीतून मिळालेल्या रक्कमेतून दहा लाख रुपये दिले होते. त्‍यानंतर आरोपीने हिना टुर्स या व्‍यवसायाची शाखा  सुरु करण्‍यासाठी फिर्यादीकडून पुन्‍हा दहा लाख रुपये घेतले. त्‍यावर आरोपीने पुन्‍हा व्‍यवसायात जास्‍तीच्‍या भांडवलाची गरज असल्याचे सांगुन फिर्यादीला चार लाख रुपयांची मागणी केली, व ती रक्कम १५ दिवसात परत देण्‍याची हमी दिली.

फिर्यादीने आरोपीला वारंवार भागीदारीपत्र तयार करुन घेण्‍याबाबत आणि व्‍यवसायातून मिळणारा नफा देण्‍याबाबत तगादा लावला. परंतू आरोपीने भागीदारीपत्र देण्‍यास नकार दिला. तसेच फिर्यादीला दहा लाखांचा एक आणि पाच लाखांचे दोन असे एकूण वीस लाखांचे धनादेश पाठविले. फिर्यादीने तीनही धनादेश वटवण्‍यासाठी टाकले असता, ते वटले नाही. या प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्या सुनावणीअंती, न्‍यायालयाने आरोपी गिरीश जैन याला सह महिन्‍याची सक्तमजुरी, आणि नुकसानभरपाई म्हणुन दहा लाख रुपये फिर्यादीला देण्‍याचे आदेश तसेच एक लाख रुपये दंड म्हणुन महिन्‍याभरात न्‍यायालयात जमा करण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले. एका महिन्‍यात आत आरोपीने दोन्‍ही रक्कमा जमा न केल्यास चार महिन्‍याच्‍या कारवासाची शिक्षा देखील न्‍यायालयाने ठोठावली. प्रकरणात फिर्यादीतर्फे राजेंद्र मुगदिया यांनी काम पाहिले. त्‍यांना प्रणिता इंगळे आणि प्राची मुगदिया यांनी सहाय केले.