प्रभू रामचंद्राला समर्पित व्यक्तिमत्व हरपले-देवेंद्र फडणवीस

भाजपा प्रदेश कार्यालयात कल्याणसिंह यांना श्रद्धांजली

मुंबई ,२५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर उभे करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची, सत्तेची पर्वा न करणारे कल्याणसिंह हे श्रीरामाला समर्पित व्यक्तिमत्व होते, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना आदरांजली वाहिली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यलयात प्रदेश उत्तर भारतीय मोर्चातर्फे कल्याणसिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग, उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रभारी व प्रवक्त्या श्वेता शालिनी,  उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संजय पांडे,  ब्रिजेश सिंग आदी या प्रसंगी उपस्थित होते.

          श्री. फडणवीस म्हणाले की, कल्याणसिंह यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राम मंदिरासाठी सुरु असलेला शेकडो वर्षांचा लढा निर्णायक टप्प्यात आला. कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत कारसेवेसाठी जमलेल्या कारसेवकांवर गोळीबार करणार नाही, हा निर्धार त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या कल्याणसिंह यांनी प्रत्यक्षात आणला. आपल्या मुख्यमंत्रीपदाची पर्वा न करता कल्याणसिंह यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी चालू असलेल्या संघर्षात अमूल्य योगदान दिले. राम मंदिरासाठी सत्तेचा त्याग करणारे कल्याणसिंह हे उत्तम शासक होते. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात कॉपी विरोधी कायदा करण्यात आला. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली, असेही श्री. फडणवीस यांनी नमूद केले.