पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबत

नवी दिल्ली ,१७ जुलै /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

देशाची राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात दिल्लीत एक बैठक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 

मोदी-पवार भेटीबाबत शिवसेना आणि काँग्रेसला होती कल्पना – मलिक

शरद पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पण ही भेट पूर्वनियोजित होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांना पूर्वकल्पना होती, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट

‘शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट असल्याने आजच्या मोदी – पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही’ असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार हे महाविकास आघाडीतचे ज्येष्ठ नेते आहे. मुळात पवारसाहेब हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे. त्यामुळे आजच्या मोदी-पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

फडणवीस – अमित शहा यांच्यात बैठक

सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून नंतर पहिल्यांदाच अमित शाह यांची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी ही भेट झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर चर्चा झाली. येत्या काळात सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराची चौकशी अधिक सखोल होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.