नारायण राणे यांना यांना अटक आणि अखेर जामीन मंजूर

रायगड,औरंगाबाद/मुंबई ,२४ऑगस्ट /प्रतिनिधी :-  मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर जामीनासाठी सुनावणी झाली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रात्री महाड महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे.नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाड इथं आणण्यात आले.

काय घडलं कोर्टात?

नारायण राणे यांच्यासारखा जबाबदार व्यक्ती बेजबाबदारपणे वागला, तसंच त्यांच्या एका वक्तव्यामुळे सर्व अप्रिय घटना घडल्या, ज्या घटना घडल्या त्याला राणेच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टासमोर केला. तर पोलिसांकडूनही सात दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. यावर उत्तर देताना राणे यांच्या वकिलांनी अटकेपूर्वी नोटीस दिली नव्हती, राणे यांच्यावर अटकेसाठी जी कलमं लावली होती, ती चुकीची आहेत, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे दाखले दिले.

Image

कोर्टात सुनावणी सुरु असताना नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे तसंच निलेश आणि नितेश राणे कोर्टात उपस्थित होते. 

नारायण राणे यांचे वकील आदिक शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

राणेंना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे.  राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.

तसंच, नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.

नारायण राणे यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, त्यामुळे महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, राणे यांच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सुद्धा महाड शहरांमध्ये दाखल झाले आहेत. रत्नागिरी, रायगड, मुंबई या विविध भागातून राणेसमर्थक मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा शिवसैनिक भाजपचे कार्यकर्ते समोर समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

राणेंच्या अटकेचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गोळवली येथील रा.स्व. संघाच्या सेवा प्रकल्पाची पाहाणी करत असताना रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले. राणे आपल्या दोन्ही मुलं आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत बंद खोलीत बसून होते. तर पोलिसांचा मोठा फौजफाटा बाहेर उभा होता.

पोलीस अधिक्षकांनी राणेंना सोबत येण्याची विनंती केली, पण जेव्हा आतमध्ये मोठा गोंधळ उडाला. निलेश राणे यांनी पोलिसांना तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का असं म्हणत हुज्जत घातली, त्यावेळी राणे जेवत असताना उठले. त्यानंतर राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

अटकेनंतर नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं असा सल्ला डॅाक्टरांनी पोलीस अधिक्षक यांना दिला आहे.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत राणे म्हणाले

अटक झाल्यानंतर या वृत्तवाहिनीला व्हि़डीओ कॉलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना नारायण राणेंना उद्धव ठाकरेंना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी, “उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन,” असं उत्तर दिलं. मुलाखत घेणाऱ्या माहिलेने “उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे?”, असं विचारलं असता राणेंनी “कुछ नही कहुंगा…” असं म्हणत एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन, असं उत्तर दिलं. “ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजाकरणामध्ये आहोत,” असं सूचक वक्तव्य राणेंनी केलं. यावेळीही त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला.

अटक झाली तेव्हा नक्की काय घडलं याबद्दलही नारायण राणेंनी यावेळी भाष्य केलं आहे. “गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं मला सांगितलं. मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हटलं. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणलं. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड येथे नेलं जात आहे,” असं राणे म्हणाले.

नारायण राणेंच्या पाठीशी भाजप उभा – देवेंद्र फडणवीस

शर्जिल उस्मानी भारतमातेला शिव्या देतो, तेव्हा कारवाईची हिंमत का होत नाही?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात याुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे.

ज्या प्रकारे पोलिसांकडून कारवाई सुरू आहे त्या बद्दल आश्चर्य वाटतं. शरजिल उस्मानी महाराष्ट्रात येतो हिंदूंच्या विरोधात भाष्य करतो त्याच्यावर कारवाई होत नाही आणि याठिकाणी अख्खं पोलीस फोर्स राणेंना पकडण्यासाठी नाशिक, पुण्याहून निघालं आहे. खरं म्हणजे कायद्याच्या भाषेत हा दखलपात्र गुन्हा नाहीये. मी नाशिकच्या पोलीस आयुक्तांचं पत्र वाचलं ते काय स्वत:ला छत्रपती समजतात का? असा प्रश्नही फडणवीसांनी उपस्थित केला.

नारायण राणेंच्या अटकेनंतर मुंबईत दिवाळी, शिवसैनिकांनी फोडले फटाके

नारायण राणे  आणि शिवसेना यांच्यातील वादाचा नवा अंक आज पाहण्यास मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अरेरावीची भाषा करणे राणे यांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी राणेंना अटक केली आहे. राणेंना अटक होताच मुंबईतील कुलाब्यात शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे.

आज सकाळपासून ठिकठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयांवर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबई, ठाण्यात, पुणे, नाशिक, सिंधुदुर्गात शिवसैनिकांनी भाजपविरोधात जोरदार राडा घातला.

संतप्त शिवसैनिकांचे क्रांतीचौकात जोडे मारो आंदोलन

नारायण राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्या विरोधात आज सकाळी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी तक्रार दाखल केली आहे.


संतप्त शिवसैनिकांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांतीचौकात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राणेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. राणेंच्या ‘कोंबडीचोर’ या उपाधीला साजेशा जिवंत कोंबड्या देखील या आंदोलनात आणल्या गेल्या होत्या.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, शहप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, उपशहरप्रमुख रमेश बहुले, अंबादास मस्के, संजय हरणे, बापू पवार, सुगंधकुमार गडवे, सतीश निकम, जयसिंह होलिये, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक समीर कुरेशी, विभागप्रमुख सुधिर चौधरी, नंदू लबडे, सतीश कटकटे, शाखाप्रमुख गोरख सोनवणे ,राहुल यलदी, पंकज वाडकर, ज्ञानेश्वर शेळके ,रणजीत दाभाडे ,स्वप्नील साबळे , नितीन पवार, शिवाजी गायकवाड ,नारायणसिंग राठोड, गणेश लोखंडे अंन्साराम वडकते नारायण जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते