उद्धव ठाकरे यांचे सरकार म्हणजे राज्याला उद्ध्वस्त करणारे सरकार-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा जल्लोषात सुरू

मुंबई ,१९ ऑगस्ट /प्रतिनिधी:- ‘बस्स.. तुमचा काळ आता संपला. जनतेला सुखाचे दिवस पाहायचे आहेत. उद्योजक घडवायचे आहेत. रोजगार वाढवायचा आहे. विकास करायचा आहे. त्यामुळे यापुढे मुंबई महापालिकेत भाजपाच सत्तेवर येईल’, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांचे गुरूवारी राजधानी दिल्लीतून विमानाने मुंबईत आगमन झाले, त्यावेळी मुंबई विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Image

मुंबई विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते प्रमोद जठार, सुनील राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार नितेश राणे, आ. आशिष शेलार, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते. भर पावसात शेकडो कार्यकर्ते राणे यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर गर्दी करून होते. ढोल-ताशांचा गजर होत होता. नारायण राणे विमानतळाबाहेर येताच त्यांना गुलाबांचा मोठा पुष्पहार घालण्यात आला. अंगावर भगवी शाल पांघरण्यात आली. श्रीफळ देऊन त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राणे यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणांनी आसमंत दुमदुमला. बाहेर पडताच राणे जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेले. तेथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राणे यांचे स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या ‘जन आशिर्वाद यात्रां’मधील ही चौथी यात्रा राणे यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात येत आहे.

नारायण राणे यांनीही उपस्थितांपुढे आपले मन मोकळे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आपण केंद्रात उद्योग मंत्री झालो आहोत. आज दिसणारा हा उत्साह, मिळणारा हा प्रतिसाद बघितला तर एकच गोष्ट दिसते ती, या राज्यातल्या सरकारला जनता कंटाळलेली आहे. हे उद्धव ठाकरे यांचे सरकार म्हणजे राज्याला उद्ध्वस्त करणारे सरकार आहे. आज दीड महिना झाला. माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करत मला देशात उद्योगांना चालना द्यायची आहे. रोजगार वाढवायचा आहे. जीडीपी वाढवायचा आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशाचा लौकिक वाढविल्याशिवाय मी राहणार नाही. दिल्लीत महाराष्ट्राचे नाव राहील असे काम करेन, असे राणे म्हणाले.

Image

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ते दोन दिवस संपूर्ण मुंबई पिंजून काढणार आहेत. याच दौऱ्यात त्यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईमध्ये आहेत. आधी मुंबई विमानतळ, नंतर बाळासाहेब स्मारक आणि दुपारी परळ या भागात नारायण राणेंनी स्थानिक जनतेशी संवाद साधला. या प्रत्येक वेळी नारायण राणेंनी मुंबई महानगर पालिका निवडणुका आणि शिवसेना या मुद्द्यांना हात घालत टीकास्त्र सोडले आहे. परळमध्ये बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खोचक टीका करतानाच आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये सत्तापालटाचा आत्मविश्वास व्यक्त केला.

Image

‘आपल्याला कोठेही रोखता येणार नाही. जशास तसे उत्तर देण्याची माझी ख्याती आहे. त्यामुळे मांजरासारखे आडवे येण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. मुंबई महापालिका जिंकण्याची जबाबदारी माझ्यावर तसेच भाजपाच्या सर्वच नेत्यांवर आहे. ही महापालिका आम्ही जिंकणारच. यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. ३२ वर्षांनंतर त्यांना खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही’, असेही ते म्हणाले.

ह्यांचे काम काय? लोकांमधून हे कधी निवडून आलेत का? आडमार्गाने येऊन बसले. त्यामुळे आम्हाला त्यांनी शिकवू नये. कोरोनाची बंधने कशी पाळायची हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. हा राजकीय कार्यक्रम नाही. जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. पावसात हा प्रतिसाद आहे. पाऊस नसता तर काय झाले असते? असा सवाल राणे यांनी केला.

फडणवीसांनी दाखविला झेंडा

आपल्या छोटेखानी भाषणानंतर राणे त्यांच्या यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या खास रथावर गेले. आशिष शेलार, प्रविण दरेकर त्यांच्यासोबत होते. प्रचंड गर्दी यावेळी उसळली होती. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा ध्वज हलवून रथयात्रेला पुढे रवाना केले.

राणेंमुळे देश होणार आत्मनिर्भर..

छत्रपतींना गुलाबपुष्प वाहून अभिवादन केल्यानंतर फडणवीस यांनी उपस्थितांसमोर स्वागतपर भाषण केले. ‘नारायण राणे यांची यात्रा साधी असूच शकत नाही. राज्यातल्या, मुंबईतल्या प्रत्येकाचा आशीर्वाद घेण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा आहे. नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खाते आहे. देशातले बहुतांश उद्योग यामध्ये येतात. आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना राणे हे या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करतील, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

‘मातोश्री’च्या अंगणातच भव्य स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर टीचर्स कॉलनी येथे नारायण राणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. माजी आमदार तृप्ती सावंत यांनी त्यांचे गुलाबपुष्पाचा हार घालून जोरदार स्वागत केले. उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी राणे यांच्या बाजूने जोरदार घोषणा दिल्या. कृपाशंकर सिंह यावेळी आवर्जून उपस्थित होते.

जे झेपेले तेच बोला!

या महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे. जितकी पदे मिळाली ती महाराष्ट्रामुळे. महाराष्ट्रामुळेच माझा दिल्लीचा मार्ग मोकळा झाला. आता खेरवाडी, कलानगरमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या कानावर माझे म्हणणे गेलेच पाहिजे. या महाराष्ट्राच्या प्रत्येक इंचावर सर्वसामान्यांचा अधिकार आहे. त्यामुळे जे झेपणार नाहीत, अशा गोष्टी कोणी करू नयेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कारभार त्यांच्या हातात राहणार नाही, याचा पुनरूच्चार राणे यांनी केला.

स्वा. सावरकर स्मारकालाही दिली भेट

दादरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर नारायण राणे यांनी प्रभादेवीतल्या स्वा. सावरकर स्मारकालाही भेट दिली. सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी अभिवादन केले.

चैत्यभूमीलाही दिली भेट

स्वा. सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली वाहिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, निलेश राणे यावेळी त्यांच्यासोबत होते.

बाळासाहेबांचा प्रेमाचा हात आजही डोक्यावर…

स्मृतीस्थळासमोर राणे झाले नतमस्तक

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी एवढंच सांगितलं की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलेलं आहे, दिलेलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझे आशीर्वाद आहेत.,असं म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत असे मला वाटते. प्रेमाची, आत्मियतेची ही भावना आहे. त्यामुळे कोणीही विरोधाची भाषा करू नये. ज्यांना बोलायचे आहे, त्यांनी सरळ बोलावे. डाव्या-उजव्याला सांगून बोलायला लावू नये’, असा सणसणित टोला केंद्रीय सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

शिवसेनेची माघार

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत तसेच काही जणांनी नारायण राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देण्यात येणार नाही, असा इशारा देत त्यांना रोखण्याच्या वल्गना केल्या होत्या. परंतु, नारायण राणे यांना तेथे जाण्यापासून रोखता येणार नसल्याचे स्पष्ट होताच या परिसरातले शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी माघारीची घोषणा केली. कोणीही शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊ शकतो. अनेकजण रोज दर्शनासाठी येतात. त्यामुळे कोणाला रोखण्याचा, अडविण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसैनिक कोणालाही अडविणार नाहीत, असे सांगत त्यांनी विनायक राऊत यांच्या वल्गनांना मूठमाती दिली. तसेच,‘मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करायला जाऊ नये म्हणून काही जणांनी प्रयत्न केले. पण, मला कोण अडविणार? अडविण्यासाठी शिवसेनेत राहिले तरी कोण? जे राहिले आहेत ते कुंपणावर बसून उड्या मारणारे.. अशी टीकाही राणे यांनी केली.



३२ वर्षांत मातोश्रीचाच विकास

‘गेली ३२ वर्षे शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेवर आहे. या काळात त्यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी काय केले? कोणाचा विकास केला? या काळात फक्त मातोश्रीचाच विकास झाला. एकाचे दोन झाले.. ’असा घणाघात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या ‘जन आशिर्वाद यात्रे’त नायगाव येथे केलेल्या चौकसभेत ते बोलत होते. ‘या मुंबईत गिरणी कामगारांची आंदोलने झाली. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली आंदोलने झाली. काय मिळाले कामगारांना? किती फायदा झाला? सध्याचे मुख्यमंत्री तर मातोश्रीच्या पिंजऱ्यातूनच बाहेर पडत नाहीत. ते कसला कारभार करणार’, असा सवालही त्यांनी केला. ‘पैसे खायचे नाहीत अशी एकही जागा यांनी सोडलेली नाही. औषधांचेही पैसे हे लोक घेतात. केवळ पैसे खाणे हेच यांचे काम राहिले आहे. एक ते २५० कोटींपर्यंतचे उद्योग निर्माण करण्याचे काम माझ्याकडे आहे. याचा उपयोग करत मी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्योजकतेतून रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार’ असेही राणे यांनी सांगितले.



हे कसले मुख्यमंत्री? हे पिंजऱ्यात राहतात…

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं. “या राज्याचे मुख्यमंत्री कुणी आहेत असं मला वाटतच नाही. काही दम नाही. कसले मुख्यमंत्री, पिंजऱ्यात राहातात, मातोश्रीच्या बाहेर निघत नाहीत. जनतेमध्ये जायला पाहिजे, प्रश्न बघायला पाहिजेत. मी मुख्यमंत्री असताना सगळ्यांनी पाहिलंय मी कसं काम केलं”, असं ते म्हणाले. ‘३२ वर्षांत बकाल करून टाकली मुंबई. किती माणसं मुंबईत करोनामुळे गेली, कुणामुळे? औषधांमध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा”, असं राणेंनी यावेळी नमूद केलं.