भारताचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय

मोहम्मद सिराजचे  सामन्यांत ८ बळी ,के एल राहुल सामनावीर

मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा अष्टपैलू खेळ 

Image
मोहम्मद सिराजचे  सामन्यांत ८ बळी

लंडन :  ऐतिहासिक लॉर्ड्सच्या दुसऱ्या  कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर १५१ धावांनी दणदणीत विजय मिळविला  आहे. या विजयाबरोबर भारताने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.या सामन्यांत  मोहम्मद सिराज ८ बळी घेतले. पहिल्या डावात शतक झळकाविणारा भारताचा के एल राहुल सामनावीर ठरला. भारताच्या चौकडी जलदगती गोलंदाजांनी इंग्लंडचे २० फलंदाज बाद केले. 

Image
के एल राहुल सामनावीर

मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे अष्टपैलू योगदान तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा १५१ धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने आपला दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला आहे. इंग्लंडला विजयासाठी आता ६० षटकात २७२ धावांचे आव्हान होते.  

इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये  भारताने  धमाकेदार पुनरागमन केले  आहे. दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सलामीवीर रोरी बर्न्सला पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले.बुमराहनंतर मोहम्मद शमीने इंग्लंडचा दुसरा सलामीवीर डॉमिनिक सिब्लेला शून्यावर माघारी धाडले. १६व्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने हसीब हमीदला पायचित पकडत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. हमीदला फक्त ९ धावांचे योगदान देता आले. इंग्लंडने १५.३ षटकात ३ बाद ४४ धावा केल्या आहेत.
चहापानाला एक चेंडू बाकी असताना इंग्लंडने जॉनी बेअरस्टोला गमावले. इशांत शर्माने त्याला वैयक्तिक २ धावांवर पायचित केले. इंग्लंडने २२ षटकात ४ बाद ६७ धावा केल्या आहेत. जो रूट ३३ धावांवर नाबाद होता.
भारताच्या विजयात अडथळा बनत चाललेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रूटच्या बॅटती कड घेतलेला चेंडू स्लीपमध्ये असलेल्या विराट कोहलीच्या हाती विसावला. रूटने ५ चौकारांसह ३३ धावा केल्या. मोईन अलीने रूटची जागा घेतली असून इंग्लंडच्या २३ षटकात ५ बाद ६७ धावा झाल्या आहेत.बुमराहने रूटला पाचव्यांदा बाद केले आहे. 
२७व्या षटकात विराट कोहलीने इंग्लंडच्या जोस बटलरचा सोपा झेल सोडला. बुमराहने टाकलेला चेंडू बटलच्या बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटकडे गेला. पण त्याला तो  झेल घेता आला नाही.
पात फलंदाजांच्या पडझडीनंतर जोस बटलर आणि मोईन अली मैदानावर स्थिरावले. 

मोहम्मद सिराजचा डबल धमाका

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एकाच षटकात मोईन अली (१३) आणि त्यानंतर आलेल्या सॅम करनला (०) बाद केले. सिराजला अलीला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटकरवी झेलबाद करत भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर करनला त्याने यष्टीमागे पंतच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. करणला दोन्ही डावात भोपळा फोडता आला नाही. 

४३व्या षटकात इंग्लंडने शतकी पल्ला ओलांडला आहे.बटलर आणि रॉबिन्सन या जोडीने १२.३ षटकांत ३० धावांची भागी केली . जसप्रीत बुमराहने ५१व्या षटकात ओली रॉबिन्सनला पायचित पकडत इंग्लंडला आठवा धक्का दिला. रॉबिन्सनने ९ धावा केल्या. इंग्लंडच्या ५०.५ षटकात ८ बाद १२० धावा झाल्या आहेत.त्यापाठोपाठ ५२ व्या  षटकांत बटलर सिराजच्या गोलंदाजीवर पंतच्या हाती झेल दिला,बटलरने ९६ चेंडूत २५ धावा केल्या.

Image

मोहम्मद सिराजने पाचव्या चेंडूवर इंग्लंडचा शेवटचा फलंदाज जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवत भारताचा विजय साकारला.भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही.  भारताने इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत भारताच्या विजय साकार केला.

Image

मोहम्मद शमी  आणि जसप्रीत बुमराह यांच्या धमाकेदार फलंदाजीमुळे मुळे भारताने लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटीत इंग्लंडच्या हातचा विजय हिरावून घेतला. भारताने पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंतला (२२) गमावले. रॉबिन्सनने त्याला बाद केले. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने ऋषभ पंतच्या रुपात पहिली विकेट गमावली, यानंतर इशांत शर्माही माघारी परतला.त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. त्यानंतर शमीने मोईन अलीला षटकार ठोकत कसोटीतील दुसरे अर्धशतक साजरे केले. डाव घोषित झाला तेव्हा मोहम्मद शमीने ६ चौकार आणि एका षटकरासह नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये नाबाद ८९ धावांची भागीदारी केली.जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी करत ३९ वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुमराह आणि शमी या दोघांनी ६६ पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल  आणि कपिल देव यांनी १९८२ मध्ये ९ व्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली होती. त्यांचा हा विक्रम शमी आणि बुमराहने मोडीत काढला आहे.
लॉर्डच्या मैदानावर बुमराह आणि शमीला तग धरून राहणं सोपे नव्हते . बुमराहच्या डोक्यावर बाउंसर चेंडू आदळला. त्यानंतर दुसऱ्या डावाच्या ९२ व्या षटकात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज मार्क वूडने बुमराहला डिवचले  आणि बुमराहने त्याला उत्तर दिलं. त्यानंतर जोस बटलरने बुमराहला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बुमराह नाराज झाला होता. मात्र तरीही त्याने धीर सोडला नाही. इंग्लंडचा कर्णधार जो रुटनेही बुमराहचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करून बुमराहने सडेतोड उत्तर दिले .जसप्रीत बुमराहने कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक धावसंख्या या सामन्यात केली आहे. यापूर्वी बुमराहने ३० डावात २ च्या सरासरीने ४३ धावा केल्या आहेत. मात्र या मालिकेत त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने २८ धावा केल्या होत्या. ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम खेळी होती. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात तो खातं खोलू शकला नाही. या डावात जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश आहे.
वेगवान गोलंदाज मार्क वुडने इंग्लंडसाठी ३ बळी घेतले. तर रॉबिन्सन आणि मोईन अली यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.पाचव्या दिवशी उपहारानंतर भारताचा  कर्णधार विराट कोहलीने भारताचा दुसरा डाव ८बाद २९८ धावांवर  घोषित केला.