हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला वेगळा पॅटर्न निर्माण केला – पालकमंत्री वर्षा गायकवाड

हिंगोली,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, राज्य राखीव दलाचे समादेशक संदिपसिंह गिल, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक  यशवंत काळे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

May be an image of 3 people and people standing

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी हिंगोली जिल्हा सज्ज आहे. हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांचे अभिनंदन केले.

कोरोनाच्या महासंकटाचा मुकाबला करत जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून विकास कामे सुरु आहेत. विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमाच्या माध्यमातून राज्याने देशापुढे आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्याच प्रमाणे हिंगोली जिल्हा देखील प्रगतीच्या वाटेवर आहे. देश, राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे, असून सांगून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

May be an image of 4 people, people standing and outdoors

कोरोना विरुध्दच्या या युध्दात देशासह महाराष्ट्र राज्य यशस्वी लढा देत आहे. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण 16 हजार 08 रुग्ण झालेले आढळले आहेत. त्यापैकी 15 हजार 608 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98 टक्के इतके आहे. तर जिल्ह्यात एकूण 389 लोकांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण संख्या असून, मृत्यूदर देखील सर्वात कमी आहे.

दूसऱ्या लाटेमध्ये कोविड केअर सेंटर, ऑक्सिजन निर्मिती, औषधांची उपलब्धता, लसीकरण, कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळा, ऑक्सिजन बेड्स आदींच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात आली. यासोबतच टाळेबंदीसह काही निर्बंध ही लागू करण्यात आले. याचा चांगला परिणाम म्हणजे रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. जिल्ह्यात 4 ऑक्सिजन टँक उभारण्यात आले आहेत. तसेच 2 ऑक्सिजन प्लाँट कार्यान्वित करण्यात आले असून आणखी 5 ऑक्सिजन प्लाँट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे दोन आणि उप जिल्हा रुग्णालय, वसमत येथे एक 20 के.एल. क्षमतेचे एकुण 3 ऑक्सिजन टँक उभारण्यात येणार आहेत.

May be an image of 2 people, people standing and outdoors

आज रोजी जिल्ह्यात 900 ऑक्सिजन बेड्स व 1 हजार 884 नॉन ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. तसेच हिंगोली  जिल्ह्यात कोविड-19 साठी स्वतंत्र 100 बेड्सचे सर्व सोयीनी युक्त कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. यामध्ये सेंट्रल ऑक्सिजन लाईन, व्हेंटीलेटर, डायलिसीस युनिटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिला व लहान मुलांसाठी 100 बेड्सचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच लेवल तीनचे इंटेन्सिव पेडीयाट्रीक केअर युनिट व 20 बेड्सचे NICU, 25 स्वतंत्र व्हेंटीलेटर, आणि 124 खाटांचे SNCU उपलब्ध करण्यात आले. तसेच 1 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन 50  बेड्चे अत्याधुनिक व्हेंटीलेटरयुक्त बाल रुग्ण अतिदक्षता केंद्र तयार करण्यात आले आहे. या अतिदक्षता केंद्रात ऑक्सिजन लाईन, कम्प्रेसड एअर लाईन आणि सक्शन लाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच या केंद्रासाठी 200 लिटर प्रती मिनिट क्षमतेचे ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्यात आला असून ऑक्सिजन टँन्कमार्फत सुध्दा ऑक्सिजन पुरविले जाणार आहे. सर्व तालुक्याच्या ठिकाणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड रुग्णांची व नवजात शिशु आणि मुलांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि इतर सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.

May be an image of 2 people, people standing and outdoors

लसीकरणासाठी जिल्ह्याला आतापर्यंत एकूण 3 लाख 06 हजार 680 लसी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी 88 केंद्र कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार 2 लाख 98 हजार 601 लसी देण्यात आल्या असुन 14 हजार लसी उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णांचा दर 9 टक्क्यावरुन आता 7.92 टक्क्यावर आला आहे. तर मागील 15 आठवड्यातील पॉझिटीव्हीटीचा दर 2 टक्क्यापेक्षा कमी आहे.

हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करुन आपल्याला या पुढेही सतत सांघीक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गायकवाड यांनी केले.

कोरोनासाठी लसीकरण सुरु झाले असले तरी अजून, धोका कमी झालेला नाही. यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर राखणे या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात HIV बाधित रुग्णांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 1 कोटी 63 लक्ष किंमतीचे स्वतंत्र ART केंद्र उभारण्यात आले आहे. भारतात असे एकूण 3 ART केंद्र असून महाराष्ट्रात हिंगोली येथे उभारण्यात आलेले पहिले ART केंद्र आहे. या केंद्रात HIV रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत 5 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केले.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय एवं आधिकारीता मंत्रालय आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून स्वर्गीय खासदार राजीवजी सातव दिव्यांग पुर्नवसन केंद्र उभारण्यात येत आहे. त्याचा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना लाभ होणार आहे.

हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलिसांचे कुटूंब व जनतेसाठी ‘पोलीस कोविड सेंटर’ सुरु करुन त्यामध्ये वैद्यकीय सोईसुविधा पुरविण्यात आल्या. तसेच कोविड-19 च्या काळात घरगुती कौटुंबिक वाद मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘भरोसा सेल’ ची स्थापना करुन हिरकणी कक्ष व मुलांना खेळण्यासाठी बाल उद्यान तयार करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, बालरोग तज्ञ डॉ. दिपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल डोंगरे, डॉ. नारायण भालेराव, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, सहाय्यक मेट्रन ज्योती पवार यांना कोविड-19 योध्दा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच यावेळी ऑनलाईन उपक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन करणाऱ्या शिक्षकांना व महात्मा ज्योतीबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या रुग्णालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित मान्यवरांची भेट भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची उपस्थिती होती.