योगी अरविंद यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

ज जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये आपण पदार्पण करत आहोत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा अनेक महानायकांच्या अथक परिश्रमाचा, निस्वार्थ त्यागाचा, आणि अतुलनीय शौर्य- बलिदानाचा इतिहास आहे. या स्वातंत्र्य वेदीवर हजारो देशभक्तांचे बळी गेल्यानंतर हा देश स्वतंत्र झाला. सार्वभौम प्रजासत्ताक बनला.

 गांधी, टिळक, सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, ही फक्त नावे नाहीत, तर काळाच्या माथ्यावर उमटलेल्या भारतमातेच्या तप्त राजमुद्रा आहेत.

 याच महानायकाच्या नामावली मध्ये एक नाव आजही अत्यंत आदराने घेतले जाते. ते म्हणजे योगी अरविंद घोष. अरविंदांच्या बाबतीतला स्वातंत्र्य लढ्याचा एक दुर्मिळ योगायोग असा, की ज्या भारतीय स्वातंत्र्याची पहाट व्हावी म्हणून त्यांनी स्वातंत्र्य सेनानी म्हणून काम केले, ते स्वातंत्र्य त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयांच्या भाग्यास आले. योगी अरविंदांना ओळखणाऱ्या अनेकांसाठी हा दैवदुर्लभ असा योगायोग होता. परंतु खुद्द अरविंदांसाठी हा योगायोग नव्हे तर अटळ असा योग होता.     

    योगी अरविंद हे बंगालमधील सुखवस्तू घरातील अपत्य. त्यांचे वडील कृष्णधन घोष हे सिव्हिल सर्जन होते. त्यांच्या वडिलांवर पाश्चात्त्य आचार-विचार, परिधान, संस्कृती, यांचा एवढा जबरदस्त पगडा होता, की आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे मालक असलेल्या छोट्या मुलांवर भारतीय मागास वातावरणाचा लेशमात्र प्रभाव पडू नये यासाठी त्यांनी झपाटल्यासारखे प्रयत्न केले. त्यांच्या लाडक्या छोट्या ऑरोला त्यांनी दार्जिलिंगच्या गोऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी असलेल्या शाळेत घातले. आपल्या मुलाच्या कानावर मातृभाषा बंगालीचा एकही शब्द पडू नये म्हणून त्यांनी काळजी घेतली. त्यांचा हा प्रयत्न इतका कमालीचा तीव्र होता, की नंतरच्या काळात अरविंदांना आपलीच मातृभाषा बंगाली शिकण्यासाठी खाजगी शिक्षक लावावा लागला. परंतु यातही असमाधानी असलेल्या कृष्णधन घोष यांनी आपल्या लहानग्या सात वर्षाच्या मुलाला स्वप्न दिले, की तू आयसीएस होऊनच भारतात परतायचे आणि अरविंदांना वयाच्या सातव्या वर्षी आपल्या आयरिश मित्राच्या जवळ इंग्लंडला शिक्षणासाठी पाठविले. कुशाग्र बुद्धीच्या अरविंदांनी ग्रीक, लॅटिन, इंग्रजी भाषा, व त्यातील अभिजात साहित्य यावर प्रभुत्व संपादन करीत केंब्रिज विद्यापीठांमध्ये असामान्य चमक दाखविली.परंतु या काळात जगाच्या इतिहासात प्रसिद्ध असलेले क्रांती नायक- इटलीचा मुसोलिनी, गॅरिबाल्डी यांच्या राष्ट्रनिर्माण कार्याचा त्यांच्यावर नकळत प्रभाव पडत होता. आयसीएस पास होऊन एक गुलाम देशाचा गुलाम अधिकारी होऊन जुलमी व्यवस्थेचा भाग होण्याची त्यांची इच्छा होत नव्हती. इंग्लंडमध्ये लोकशाही न्यायव्यवस्थेच्या गप्पा मारणारे ब्रिटिश भारतासारख्या वसाहती देशांना जुलूमशाहीने दडपतात, अन्यायाचा वरवंटा बेदरकारपणे चालवतात हे त्यांना इंग्लंडमध्ये राहताना धक्का देत होते. परंतु वडिलांची इच्छा पूर्ण करणे, व स्वतःची पात्रता सिद्ध करणे या दोन उद्दिष्टांपोटी त्यांनी आय.सी.एस. ची परीक्षा मन लावून दिली व चांगल्या गुणांनी पासही करून  दाखवली. परंतु या परीक्षेनंतर ब्रिटिश साम्राज्याचा बडेजाव मिरवणाऱ्या परंपरेचा एक भाग असणारी शेवटची जुजबी परीक्षा-घोड्यावर बसून रपेट मारणे अशी होती. या परीक्षेस त्यांनी नकार दिला. मित्रांनी अतिशय आग्रह करूनही त्यांनी ही परीक्षा दिली नाही व स्वेच्छेने आय सी एस म्हणजे भारतातील सर्वोच्च पदावरील अधिकारी होण्याच्या प्रलोभनाला सहजपणे नाकारले. हा श्री अरविंद यांच्या देशभक्तीचा पहिला आविष्कार होता.  

  आपल्या इंग्लंडमधील वास्तव्यात फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवत असताना अरविंदांवर फ्रेंच राज्यक्रांतीचा, त्यामधील जेन ऑफ आर्क या देशभक्त स्त्रीचा फार प्रभाव पडला. ग्रीकांच्या क्रांतीचाही त्यांच्यावर प्रभाव होता. फक्त पाच वर्षात स्वतंत्र होणाऱ्या फ्रेंचांचे त्यांना कौतुक वाटत होते. आपली मूल्ये- संस्कृती यांना प्राणपणाने जपणारे फ्रेंच- ग्रीक यांच्याशी भारतीयांचे साधर्म्य आहे असे त्यांना तेव्हा प्रकर्षाने वाटत होते. केवळ स्वार्थासाठी  जगणाऱ्या व्यवहारी ब्रिटीशांचा माणुसकीशून्य व्यवहार त्यांना अजिबात आवडत नव्हता. त्यामुळे तत्कालीन इंग्लंडमध्ये सक्रिय असणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या ‘लोटस अँड डॅगर्स’ या गुप्त संघटनेचे सभासद बनले. या ठिकाणी जे. कृष्णमूर्तींच्या तत्वज्ञानाची आठवण होते. ते म्हणतात, तुम्ही एखाद्या व्यक्तीत्वावर विशिष्ट उद्दिष्टांनी आवश्यकतेपेक्षा जास्त काही घडवण्याचे प्रयत्न केले तर कदाचित उलट परिणाम होतात. अरविंदांच्या बाबतीत नेमके हेच घडले. त्यांच्या वडिलांनी प्रयत्न केले त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा वरच्या फळीतील सेवक करण्याचे. पण प्रत्यक्षात ते ब्रिटिश साम्राज्याचे वरच्या फळीतील विरोधक बनले. आपले शिक्षण संपल्यावर 1892 मध्ये ते भारतात परतले व मातृभूमीच्या स्पर्शाने भारावून गेले.     भारतामध्ये परतल्यावर आईच्या आग्रहामुळे त्यांनी बंगाली व संस्कृत भाषा शिकल्या. बंकिमचंद्र चटर्जी यांचे साहित्य व प्राचीन अध्यात्मिक परंपरेतील दुर्मिळ साहित्य झपाट्याने वाचले. त्यामधून त्यांच्या राष्ट्र प्रेमाला आणखीनच जास्त मजबुती व तीव्र धार आली. 

बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे महसूल खात्यात नोकरी करताना महाराजांची भाषणे लिहून देण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर बडोद्याच्या कॉलेजमध्ये चार वर्षे इंग्रजीचे प्रोफेसर व त्यानंतर प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. या दरम्यान अरविंदानी देशातील तत्कालीन स्थितीबाबत अत्यंत परखड भाषेत ‘इंदुप्रकाश’ या वर्तमानपत्रामध्ये आपले लेख लिहिण्यास सुरुवात केली. अरविंदांच्या भाषेचा रोख इतका परखड आणि थेट होता, की रानडे सारख्या नेमस्त नेत्यांना भीती वाटू लागली. त्यांनी अरविंदांना सौम्य भाषेत व सुधारणावादी विषयांवर लिहिण्याचा मावळ सल्ला देऊन पाहिला. अरविंद यांची ही राष्ट्रप्रेम जागे करणारी लेखमालिका अत्यंत लोकप्रिय तर ठरलीच परंतु बाणांसारख्या शब्दांनी अचूक परिणाम साधत तरुण व सुशिक्षित नागरिकांच्या, तसेच युवकांच्या हृदयात देशप्रेमाचा पाझर फोडू लागली. पुढे असेच लेख त्यांनी ‘कर्मयोगी’ व इतर पत्रिकांमध्ये लिहिले.      

 अरविंदानी हे हेरले होते की या प्रचंड मोठ्या बहुभाषिक, बहुधार्मिक, देशामध्ये आपण सारे भारतीय आहोत, व हा संपूर्ण देश आपला आहे, ही मानसिक ऐक्याची भावना निर्माण करणे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची भावना निर्माण करणे, हे पहिले महत्त्वाचे काम आहे. अन्यथा युगानुयुगे छोट्या- मोठ्या राज्यांमध्ये विभागलेली, राजघराण्यांच्या वंशपरंपराना आपला परमेश्वर मानणारी, वारंवार आसमानी व सुलतानी संकटाने जोडलेली जनता, आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या संघर्षात पिचलेली, कोणताही व्यापक सामाजिक- राजकीय विचार- आचार नसलेली भारतीय जनता, ही देशभक्ती सारख्या उदात्त व व्यापक विचाराने भारावून जाणे हे दुरापास्त होते. त्यामुळे आपल्या लेखणीच्या माध्यमातून हे काम करण्याचे अरविंदांनी ठरवले. ‘कृणवंतो विश्वआर्यम’ म्हणजे हा सारा देश आर्यव्रत आहे, व विश्व आर्यमय करणे हे आपले ध्येय आहे, अशी ऐक्याची भावना निर्माण करण्याचे काम या काळामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी बर्‍यापैकी केले होते. बंगालमध्ये श्री रामकृष्ण परमहंस व त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांच्या भाव धारेने ‘शिवभावे जीव सेवा’ या उद्दिष्टाने काम करणारी नि:स्वार्थ युवकांची एक मोठी फळी निर्माण केली होती.यातील विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांनी भारावलेली तरुण पिढी ही सुशिक्षित व विचारांवर ठाम निष्ठा असलेली होती.  आपल्या आदर्श विवेकानंदांच्या प्रमाणे उद्दिष्टप्राप्तीसाठी आयुष्याला पणाला लावण्याची त्यांची तयारी होती. अरविंदांना या पार्श्वभूमीचा आपल्या कार्यासाठी अतिशय उपयोग झाला. अरविंदांनी आपल्या लेख मालिकेमध्ये हे स्पष्ट लिहिले, की स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्याला बाहेरच्या शत्रु सोबत लढण्या अगोदर आतील शत्रूंशी लढावे लागेल. आपल्या हृदयातील भित्रेपणा, स्वार्थीपणा, लबाडी, संधीसाधूपणा, खोटारडेपणा, यापासून आपल्याला सर्वप्रथम मुक्त व्हावे लागेल. माणसाला पराभूत मनोवृत्तीचे बनवणाऱ्या व पारतंत्र्यात ठेवणाऱ्या या दुर्गुणांमधून सर्वप्रथम मुक्त व्हावे लागेल. मग बाहेरच्या शत्रूंना हरवणे अवघड होणार नाही. क्रांती अगोदर आपल्या अंतर्यामी घडली पाहिजे. मग ती बाहेर घडते. असा विचार त्यांनी तरुण पिढीला दिला. आपल्या असंख्य कविता व नाटकांमधून त्यांनी देशभक्तीचे स्फुरण चढणार्‍या साहित्याची निर्मिती केली. ‘विदुला’ सारख्या नाटकांमधून पौरुष्य हरवलेल्या आपल्या मुलाला देशासाठी लढण्याची भान आणणारी करारी स्त्री त्यांनी प्रभावीपणे रेखाटली.    

 म्हणायला तसे ते एका केंब्रिज होऊन परतलेल्या प्रभावी साहित्यिकाचे साहित्य निर्माण होते, परंतु अंतरीचा उद्देश हा स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणा देणारे साहित्य निर्माण करणे हा होता. त्यांच्या या साहित्याने भारावून जाऊन क्रांतिकारक निर्माण व्हायला सुरुवात झाली होती.            आपल्या पत्नीला लिहिलेल्या एका सुप्रसिद्ध पत्रात ते लिहितात,      

   “हा देश म्हणजे माझ्यासाठी भूमीचा एक भौगोलिक तुकडा नाही. ही माझ्यासाठी माझी मातृभूमी, माझी आई आहे. अगदी जिवंत आई. आणि तूच सांग, आपल्या आईच्या छातीवर एक राक्षस-सैतान बसलेला आहे आणि तो जुलमीपणे तिचे रक्त शोषत आहे तर मी, तीचा मुलगा, कसा काय शांत बसू शकतो? मला तिला मुक्त केलेच पाहिजे.”        भारतीय स्वातंत्र्यासाठी पुढे महत्वाची काम करणारी काँग्रेस या काळामध्ये अत्यंत प्राथमिक अवस्थेत चाचपडत होती. अत्यंत मवाळ धोरण आणि ब्रिटिशांच्या कलाने शिस्तीत-अदबीने अर्ज विनंत्या करणे,पाठपुरावा करणे व ब्रिटिश सरकार देते तेवढ्या गोष्टी पदरात पाडून घेण्यात धन्यता मानने ही तत्कालीन काँग्रेसची धोरणात्मक नीती होती. त्यांना ब्रिटिशांच्या ब्रिटिशांच्या न्याय बुद्धीवर अनाठाई विश्वास होता. ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देण्याची काँग्रेसमध्ये धमकही नव्हती आणि तसा काही इरादाही नव्हता.   

      अरविंदांनी ओळखले, की या पद्धतीने स्वातंत्र्यप्राप्तीला युगानुयुगे लागतील. त्यामुळे त्यांनी थेट काँग्रेसच्या मवाळ धोरणांवर शरसंधान सुरू केले. छोट्या- छोट्या सुधारणांची भीक मागणाऱ्या काँग्रेसला त्यांनी उद्दिष्टांमध्ये चुकलेली व कणाहीन संघटना म्हणून धिक्कारले.            

 तत्कालीन मानसिकतेला छेद देत अरविंदांनी थेट ‘पूर्ण स्वराज्य’ म्हणजे ‘संपूर्ण स्वातंत्र्याचे’ उद्दिष्ट जाहीर केले. सर्व भारतीयांना स्वातंत्र्याच्या चळवळीचे स्पष्ट व अंतिम उद्दिष्ट देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम अरविंदांनी केले. त्या दृष्टीने त्यांना भारतीय स्वातंत्र्याचे उदगाते म्हटले तरी उचितच ठरेल. नुसती उद्घोषणा नव्हे तर स्वराज- स्वातंत्र्य हेच अंतिम उद्दिष्ट, ही कल्पना भारतीय जनमानसाच्या मानसिकतेचा सहजभाव होईपर्यंत ठामपणे लावून धरण्याचे काम अरविंदानी सातत्याने व धीरोदात्तपणे केले.                        

खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 1906 ते 1910 ही चारच वर्षे सक्रिय राहूनही या लढ्यास इतक्या कमी कालावधीमध्ये अमूलाग्र परिवर्तनाची दिशा देण्याचे आश्चर्यकारक काम श्री अरविंद यांनी केले. त्याबद्दल त्यांना सलामच केला पाहिजे.   

  धर्म व धार्मिकता ही सामान्य भारतीयांच्या रक्तामध्येच आहे व कोणतेही व्यापक उद्दिष्ट हे धर्मकार्य समजूनच केले तर त्याला सामान्यांच्या हृदया मध्ये स्थान मिळते, व्यापक जनाधार मिळतो, हे अरविंदांना स्वानुभवावरून माहिती होते. त्यामुळे देशभक्तीला त्यांनी आध्यात्मिकतेचा आधार दिला. देव, देश व धर्म हे एकच आहेत, त्यामुळे देश सेवा करणे हे धर्मकार्य करण्या इतकेच पवित्र, महान कार्य आहे याचा त्यांनी प्रचार- प्रसार केला. महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, यांनी यापूर्वी योग्य अशी मनोभूमिका तयार केलेली होतीच. याच भूमिकेला अरविंदानी पुढे नेण्याचे कार्य केले. त्यामुळे प्राणाची आहुती देण्यास तयार असलेले, घरादाराचा त्याग करून आलेले हजारो युवक क्रांतीकार्यामध्ये सहभागी होऊ लागले.           

आर.सी. मजुमदार यांच्या मते, “अरविंदांनी देशभक्तीला धर्माचरणाच्या समांतर नेऊन ठेवले. त्यामुळे आपल्या कार्यसिद्धीच्या मार्गामध्ये झेलावी लागणारी असंख्य दुःखे व वेदना ही मातृभूमीला अर्पण केलेली फुले आहेत असे मानून मरनांत हालअपेष्टा हसत हसत सहन करणारी व ओठावर स्मितहास्य ठेवत फाशीच्या तख्तावर चढणारी युवापिढी भारतामध्ये निर्माण झाली.” 

त्यानंतरच्या काळात बंगालमध्ये लेफ्टनंट गव्हर्नरची ट्रेन बॉम्बने उडविण्याचा मिदनापूर कट, किंग्जफोर्ड या जुलमी ब्रिटिश न्यायाधीशाला मारण्याचा मुजफ्फरपुर कट, अशा क्रांतिकारी घटना घडल्या. या सर्वांचे प्रेरणास्त्रोत अरविंद आहेत अशी ब्रिटिशांची खात्री होती. त्यामुळे इंग्लंडला पाठविलेल्या आपल्या रिपोर्ट मध्ये ब्रिटिश गव्हर्नरने त्यांची संभावना “भारतातील सध्या असणारा सर्वात धोकादायक माणूस” (द मोस्ट डेंजरस मॅन इन इंडिया) असा केला. अलीपुर बॉम्ब खटल्यामध्ये अरविंद यांना अटक करण्यात आली व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यावेळी त्यांची वकिली करणार्‍या बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी,                        “आज न्यायालयात शांत बसलेल्या या माणसाचे विचार काळाच्या माथ्यावर पाय देऊन पुढे युगानुयुगे वाचले जातील, उच्चारली जातील” असा युक्तिवाद केला. अरविंद यांची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतरही त्यांच्या अटकेची शक्यता असल्याची गुप्त खबर भगिनी निवेदिता यांनी दिली व अरविंदानी भारत सोडून फ्रेंच वसाहत असलेल्या पॉंडेचरी ला आपल्या आध्यात्मिक साधनेची गुहा बनविले. त्यानंतरच्या काळात अध्यात्माच्या असीमाला कवेत आणण्याचे त्यांचे योगीक प्रयोग सुरू झाले व भारताच्या स्वातंत्र्याची आश्वस्त हमी आपल्या अनुयायांना देत त्यांनी स्वातंत्र्य चळवळी मध्ये उदय पावणाऱ्या गांधी युगाला वाट करून दिली.

प्राचार्य विवेक मिरगणे

संपर्क क्र. ९४२००१५५०१

[email protected]

www.sriaurobindocentreabad.in

श्रीअरविंद केंद्र, औरंगाबाद.